आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचे धाडस ; ३२ मिनिटांमध्ये लंपास केले १५ लाखांचे दागिने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ : शहरातील श्रीराम मंदीर आणि माेठ्या मशीदीदरम्यान असलेले अशोक अण्णाजी सराफ या दुकानात चोरट्यांनी हातसफाई केल्याची घटना शनिवारी सकाळी उघड झाली. दुकानाच्या छतावरील लाकडी दरवाजा तोडून शनिवारी पहाटे दोन चोरटे आत शिरले. आतून कुलूपबंद असलेल्या दरवाजाला चोरांनी बाहेरून धक्का मारल्याने कडीकोंडा तुटला. चोरट्यांच्या हालचाली दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. निर्ढावलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्हीकडे पाहून स्मितहास्य केले. शनिवारी पहाटे ३.५६ वाजता दुकानात शिरलेले चोरटे ४.२८ वाजता बाहेर पडले. ३२ मिनिटांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि एक लाख रुपये रोख असा एकूण १४ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लांबवला. 


अशाेक अण्णाजी सराफ यांचे दुकान भरवस्तीत आहे. या दुकानात धाडसी चोरी झाल्यामुळे शहरातील सराफ व्यावसायीक धास्तावले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता कपिल सराफ यांनी कुलूप लावून दुकान बंद केले होते. शनिवारी सकाळी ९.३० वाजता कपिल आपले बंधू कौस्तूभ यांच्यासोबत दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली. दुकानात ठेवलेली राेख रक्कम आणि दागिन्यांचे ड्रॉवर उघडे होते. त्यामुळे दोन्ही भावांनी तत्काळ वडील अशाेक सराफ यांना माहिती कळवली. या घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना कळवण्यात आली. बाजारपेठ पाेलिस तत्काळ दुकानात हजर झाले. पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांच्यासह डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. पाहणीत चोरट्यांनी छतावरील दरवाजा तोडल्याचे आढळले. दुकानाच्या गच्चीवरही पोलिसांनी पाहणी केली. श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानाने दुकानाच्या मागील बाजूचा मार्ग दाखवला. चाेरीची माहिती मिळताच शहरातील सराफ व्यावसायिक अशाेक सराफ यांच्या दुकानाजवळ जमले. व्यावसायिकांनी दुकानमालकांची भेट घेऊन सांत्त्वन केले, तसेच चोरीची माहिती घेतली. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आहे. कपिल सराफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 


घटनेदरम्यान चाेरट्यांची सावली दिसली 
अशाेक अण्णाजी सराफ यांच्या दुकानाच्या बाजूलाच श्रीराम मंदिराचे व्यवस्थापक रामभाऊ चाैक राहतात. चौक यांना शनिवारी पहाटे ४ वाजता जाग आली होती. घराजवळील सराफ दुकानाच्या गच्चीवरील चोरट्यांची सावली त्यांना दिसली. त्यामुळे घराजवळच राहणारे खासगी सुरक्षा कंपनीचे अधिकारी विनोद शर्मा यांना चौक यांनी फोनवरून माहिती कळवली. शर्मा यांनी तत्काळ सहकाऱ्याला सोबत घेऊन मंदिराच्या परिसरात पाहणी केली. मात्र, त्यांना कुणीही न आढळले नाही. त्यांना कुणकूण लागली असती, तर चोरट्यांना पकडता आले असते. 


मुद्देमाल लंपास 
अडीच लाखांचे ८० ग्रॅमचे साेन्याचे पदक,एक लाखांचे बुलाख व फुल्या, ८० हजार रूपये किंमतीच्या साेन्याच्या अंगठ्या, ३ लाख रूपये किंमतीचा राणीहार, २५ हजार रूपये किंमतीची साेन्याची ठुसी, चार लाख रूपये किमतीच्या ताेरड्या, २ लाख रूपये किंमतीचे वजनाचे जाेडवे, एक लाख रूपये राेख आणि १५ हजार रूपये किमतीच्या बेन्टेक्सच्या बांगड्या.


टॉर्चच्या उजेडात चोरी 
दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केली. चाेरट्यांनी दुकानातील सीसीटिव्हीकडे पाहून स्मितहास्य करत आपला हेतू साध्य केला. टॉर्चच्या प्रकाशात चोरट्यांनी मुद्देमाल लांबवला. विशेष म्हणजे दोन्ही चाेरट्यांनी चेहरा न झाकता चोरी केली. त्यामुळे चोरट्यांना सीसीटीव्हीची भीती नसल्याचे समोर आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...