Crime / भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 15 बड्या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती, सगळेच आयुक्त किंवा त्यापेक्षा मोठ्या रँकिंगचे अधिकारी

गेल्या आठवड्यातच अशा 12 अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

दिव्य मराठी वेब

Jun 18,2019 04:41:42 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कर विभागातील 15 बड्या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे. या सर्वच अधिकाऱ्यांवर चोरी, घोटाळा, भ्रष्टाचार आणि बळजबरी पैसे उकळण्याचे आरोप लागले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 12 वरिष्ठ कर अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यातच घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे. यातील 11 अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआय चौकशी देखील सुरू होती.


केंद्र सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, सक्तीची निवृत्ती देण्यात आलेले सर्वच 15 अधिकारी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे अधिकारी होते. निवृत्ती देण्यात आलेल्यांपैकी 11 अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआय चौकशी सुरू होती. दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात महसूल विभाग चौकशी करत होते. हे सर्व अधिकारी आयुक्त आणि त्याहीपेक्षा मोठ्या रँकिंगचे अधिकारी होते. यादीत प्रिन्सिपल कमिश्नर अनुप श्रीवास्तव यांचे नाव आहे. त्यांच्या विरोधात गुन्हेगारी षडयंत्र आणि भ्रष्टाचाराचे दोन तपास सुरू होते. यासोबतच त्यांनी पिळवणूक, खंडणी, वसूली आणि इनकमपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचे देखील आरोप आहेत. याच यादीत सीबीआयकडून दोन खटल्यांत चौकशी सुरू असलेले कमिश्नर अतुल दीक्षित यांचा देखील समावेश आहे. या सर्वच अधिकाऱ्यांना 3 महिन्यांचे वेतन आणि भत्ते देऊन तत्काळ निवृत्ती देण्यात आली आहे.

X
COMMENT