आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा परिषदेत आत्मदहनासाठी पोहोचले सरपंचांसह 15 जण, समुपदेशनानंतर बदलला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जलयुक्‍त शिवारामधील सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार करुन चौकशीची मागणी केली. तरीही सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्याचा विरोध करत गंगापूर येथील कोडापूर-झांझर्डीच्या सरपंचांसह 10 ते 15 जण मंगळवारी जिल्हा परिषदेत आत्मदहनासाठी पोहोचले. मात्र, ऐनवेळी अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी हा अनर्थ टाळला. त्यांनी सुरुवातीला फिर्यादींशी चर्चा करुन समुपदेशन केले. तसेच सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अध्यक्षांच्या या प्रयत्नातून सरपंचांनी आपला निर्णय बदलला. ही घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.


गंगापूर तालूक्‍यातील कोडापूर-झांझर्डी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जलयुक्‍तमधून मार्चमध्ये 18 लाख रुपयांच्या सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अद्याप हे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याची तक्रार सरपंच विठ्ठल साहेबराव राउत यांनी 11 जून रोजी ई-टपालद्वारे केली होती. उपोषणाला देखील बसले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा 27 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र पाठवून त्यात निकृष्ट कामाची चौकशी नाही झाल्यास आत्महत्या करू असा इशारा दिला. परंतु, 27 जूनपासूनच मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर गेल्या आणि मंगळवारी सरपंच विठ्ठल राउत, उपसरपंच व ग्रामस्थ असे दहा ते पंधरा जण जिल्हा परिषदेत दाखल झाले.


आत्मदहनाच्या नोटिशीनंतर याबाबत पोलिसांना कळवण्यात आल्याने पोलिस आधीच दाखल झाले होते. सीईओ नसल्याचे समजल्यानंतर हे सर्वजण अध्यक्षांच्या दालनासमोर असताना त्यांना अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी बोलावुन घेतले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तीन दिवसात कामाबाबत चौकशी करून अहवाल देण्याचे त्यांनी आदेश दिले व आंदोलनकर्ते ग्रामस्थांना लेखी आश्‍वासन दिले. यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. लेखी आश्‍वासन मिळाल्याने सरपंचांनी आत्मदहनाचा निर्णय स्थगित केल्याचे लिहून दिले. त्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.