आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये १५० लोक ठार झाले असते, म्हणून युद्ध रोखले : ट्रम्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी कारवाईचे आदेश मागे घेतले आहेत. कारवाईत मोठ्या संख्येने सामान्य लोक ठार झाले असते, असे त्यामागील कारण असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सायंकाळी इराण प्रत्युत्तरादाखल कारवाई करेल, असे अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांना वाटत होते. ट्रम्प यांनी इराणच्या विशिष्ट भागात उदाहरणार्थ रडार, क्षेपणास्त्र बॅटरी इत्यादी ठिकाणांवर हल्ले करण्याबाबत सहमती दर्शवली होती. परंतु अचानक त्यांनी निर्णय मागे घेतला. विमान आणि सागरी युद्धनौका सज्ज होत्या. परंतु कोणतेही क्षेपणास्त्र डागण्यात आले नाही. कारण राष्ट्राध्यक्षांचा आदेश बदलला होता, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी केली जाणार होती. त्यामुळे इराणी सैन्य किंवा सामान्य लोकांची हानी होणार नाही, असा अंदाज होता. इराणवरील हल्ल्याची योजना अजूनही आहे किंवा नाही, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. व्हाइट हाऊस पेंटागॉनने यासंबंधीच्या वृत्तावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 


इराणचा पुन्हा दावा : इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड॰सनी गुरुवारी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे ड्रोन पाडले होते. ड्रोनने सीमेत घुसखोरी केल्यामुळे ते क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आले, असे इराणचे म्हणणे आहे. अमेरिकेने मात्र ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमेवर होते व इराणच्या सीमेचे उल्लंघन करण्यात आले नव्हते, असा दावा केला. 
 

रशियाचा इशारा  : अमेरिकेने हल्ला केला असता तर विध्वंस भरून निघाला नसता 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना रशियाने इशारा दिला. अमेरिकेने इराणवर हल्ला केला असता तर त्यानंतर मोठा विध्वंस झाला असता. त्याची नुकसान भरपाई होऊ शकली नसती. चीननेदेखील अमेरिकेला संयम ठेवायला व इराणवर हल्ला करू नये, असे आवाहन केले. ट्रम्प यांचा आदेश पाळला असता तर मध्य-पूर्व आशियातील अमेरिकेची पाच वर्षांतील ही तिसरी कारवाई ठरली असती. २०१७, २०१८ मध्ये अमेरिकेने सिरियात सैन्य कारवाई केली होती. 
 

रशियाच्या वृत्तसंस्थेचा दावा : निवडणूक जिंकण्यासाठी इराणशी युद्धाचे मनसुबे 
हल्ल्यामागे अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचा मनसुबा असल्याचा दावा रशियाच्या स्पुटनिक वृत्तसंस्थेने तज्ञांच्या हवाल्याने केला. पुढील वर्षी ही निवडणूक होणार आहे. म्हणूनच ट्रम्प जाणूनबुजून इराणच्या विरोधात अपप्रचार करू लागले आहेत. देशाला एकजूट करून निवडणुकीतील दावेदारी बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. ट्रम्प यांनी मंगळवारी फ्लोरिडातील जाहीर सभेतून २०२० मधील निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. 
 

> लढाऊ विमान व समुद्रात युद्धनौका सज्ज होते, क्षेपणास्त्र डागले नाही

> कारवाई शुक्रवारी सकाळी करण्याची तयारी, सामान्य लोकांची हानी 

 

इराणने ड्रोनचा ढिगारा दाखवला होता, दोन वेळा इशारा देत दिली होती चिथावणी 

अमेरिकेच्या सर्व्हिलन्स ड्रोनला पाडल्यानंतर इराणने काही छायाचित्रे जारी केली होती. इराणच्या टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिआेमध्ये अमेरिकी ड्रोनचा ढिगारा दाखवला होता. आेमानच्या खाडीवर उडणाऱ्या अमेरिकेच्या गुप्तचर ड्रोनला पाडण्यासाठी आधी दोन वेळा इशारा देण्यात आला होता. रॉयटर्सच्या मते ट्रम्प यांनी आेमानच्या माध्यमातून इराणला एक संदेश दिला होता. परंतु इराणने हा कथित प्रस्ताव फेटाळला होता. 
 

वक्तव्य : उत्तर देण्याची योग्य पद्धत नव्हती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराणला उत्तर देण्यासाठी आम्ही काल रात्री पूर्ण सज्ज होतो. तीन ठिकाणे निश्चित केली होती. या हल्ल्यात किती लोक मारले जातील, असे मी अधिकाऱ्यांना विचारले. सर, १५० लाेक ठार होतील, असे एका जनरलने सांगितले. त्यानंतर मी हवाई हल्ल्यास १० मिनिटांत रोखले. उत्तर देण्याची ही योग्य पद्धत नव्हती, असे मला वाटले.