आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी 151 जणांच्या मुलाखती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी बुधवारी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीला हजेरी लावली. सकाळी साडेअकरापासून सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. सर्व प्रभागांतून मिळून १५१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. प्रभाग ३ मधून सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारांची यादी व त्यांची माहिती प्रदेश समितीकडे पाठवली जाणार असून त्यानंतरच ती जाहीर करण्यात येणार आहे.


भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीच्या बुधवारी मुलाखती झाल्या. सर्वच प्रभागांतून मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सावेडीतील बहुतेक इच्छुकांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीसाठी हजेरी लावली. ढोल-ताशांच्या गजरात इच्छुकांनी राष्ट्रवादी भवनात प्रवेश केला. अनेकांनी दुचाकी रॅली काढत घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी भवन परिसर व हॉल समर्थकांच्या गर्दीने भरून गेला होता. मुलाखत घेणारी समिती सकाळीच राष्ट्रवादी भवनात हजर झाले. आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते आदींच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या.


िवशेष म्हणजे या मुलाखतींमध्ये इच्छुकांना कोणताही प्रश्न विचारण्यात आला नाही. इच्छुकांनीच आपला प्रभाग, सामाजिक कामाची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली. मुलाखती बंद खोलीत न घेता हॉलमध्ये सर्वांसमोर घेण्यात आल्या. संबंधित इच्छुक उमेदवाराचे ठरावीक कार्यकर्ते उमेदवारी का द्यावी, याबाबत स्पष्टीकरण देत होते. सर्वच इच्छुकांच्या मुलाखती याच पध्दतीने झाल्या. मुलाखत सुरू असतानाच समर्थक जोरदार घोषणाबाजी करत होते. इच्छुकांच्या मुलाखतीनंतर आता गुरुवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यानंतर यादी प्रदेश समितीकडे पाठवली जाणार आहे.


प्रभाग ३ मधून सर्वाधिक इच्छुक, दोन दिवसांत यादी जाहीर
प्रभाग चारमधील इच्छुकांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली. छायािचत्रे : उदय जोशी.राष्ट्रवादीच्या मुलाखतीसाठी येताना इच्छुकांनी असे शक्तिप्रदर्शन केले.


सागर बोरुडेंचा आज प्रवेश
शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक डॉ. सागर बोरुडे हे आपल्या समर्थकांसह मुलाखतीसाठी आले होते. परंतु त्यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नसल्याने त्यांना मुलाखत न देताच परतावे लागले. आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी गुरूवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. बोरूडे प्रभाग १ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.


भोसले, गाडे यांच्याही झाल्या मुलाखती
राष्ट्रवादीने एकाच दिवसात सर्व प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मनसेचे नगरसेवक गणेश भोसले यांनीही मुलाखत दिली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी ज्योती गाडे यांनी प्रभाग ४ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली. प्रभाग ४ मधील इच्छुक उमेदवारांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.


पुन्हा संधी मिळेल...
नगर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीने नेहमीच प्रयत्न केले. त्यातून झालेल्या विकासकामांच्या जोरावरच ही निवडणूक लढवणार अाहे. नगरकर आम्हाला पुन्हा संधी देतील, ही खात्री आहे. उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.'' संग्राम जगताप, आमदार

बातम्या आणखी आहेत...