आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या विधानसभेत पन्नाशीपार 152 आमदार, तरुणांची संख्या फक्त 42 च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : महाराष्ट्रात नवे सरकार, नवी विधानसभा कधी अस्तित्वात येईल याची राज्यभर उत्सुकता आहे. यंदाची विधानसभा तरुण आणि ज्येष्ठांचा मेळ घालणारी असणार आहे. आमदारांच्या वयोगटाबाबत एडीआर या संस्थेने केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. नव्या विधानसभेत पन्नाशीपार १५२ आमदार आहेत, तर २५ ते ५० या वयोगटात १३३ आमदार आहेत.


राजकारणात तरुणांना संधी मिळायला हवी, असे सर्वच पक्ष सांगतात. परंतु, खरच नव्या विधानसभेत लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कोणत्या वयोगटातील आहेत, यातील तरुण किती, पन्नाशी, साठी ओलांडलेले किती याबाबत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने सन २०१९ च्या विधानसभेत जाणाऱ्या आमदारांच्या वयोगटाबाबत आपल्या माहिती अहवालातून दिली आहे. २८८ पैकी २८५ आमदारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला गेला आहे.

साठीपर्यंतचे सर्वाधिक १०१ आमदार
पन्नाशी पार केलेल्या आमदारांची संख्याही मोठी आहे. ५१ ते ६० या वयोगटात तब्बल १०१ आमदार आहेत. तर, ६१ ते ७० या वयोगटातही ४८ आमदार आहेत, तर ३ आमदार हे ७१ ते ८० या वयोगटात येत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.


९१ आमदार पन्नाशीत : ४१ ते ५० वर्षे या वयोगटात असणारे ९१ आमदार नव्या विधानसभेत असतील. त्यामुळे २५ ते ५० या वयोगटात असणऱ्या एकूण आमदारांची संख्या ही १३३ इतकी असणार आहे. त्यामुळे पन्नाशीपर्यंत असलेले हे आमदार तडफदार असतील.


महिलांचा टक्का केवळ एकने वाढला : चाैदाव्या विधानसभेत २४ आमदार या महिला आहेत. एकूण आमदारांच्या तुलनेत त्यांची टक्केवारी ८ टक्के इतकीच आहे. तर, २६१ आमदार हे पुरुष आहेत. सन २०१४ मध्ये २८८ पैकी २० आमदार या महिला होत्या, त्यांची टक्केवारी ७ टक्के होती.

सहा आमदार तिशीत; ३६ चाळिशीत
या अहवालानुसार, अवघे ६ आमदार हे २५ ते ३० या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. तिशीपर्यंतच खरे तर तरुण आमदार असे म्हणता येईल. परंतु, हल्ली चाळिशीतील राजकारणीही 'युवा नेता' असतो. ३१ ते ४० या वयोगटात असणाऱ्या आमदारांची संख्याही ३६ इतकी आहे. म्हणजेच २५ ते ४० या वयोगटात ४२ आमदार आहेत.

वयाेमानानुसार नूतन आमदारांची टक्केवारी
२५-४० वयोगट : १५ % 
४१-६० वयोगट : ६७ %
६१-८० वयोगट : १८ %