Home | National | Delhi | 156 EX army officers wrote letter to President Ramnath Kovind

सैन्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नका, 156 माजी लष्करी अधिकाऱ्यांनी दिले राष्ट्रपतींना पत्र

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 02:50 PM IST

माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्रात योगी आदित्यनाथांचा उल्लेख

 • 156 EX army officers wrote letter to President Ramnath Kovind

  नवी दिल्ली- सैन्याचा राजकारणासाठी वापर होण्यावर माजी सैनिकांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात देशातील तब्बल 156 माजी लष्करी अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. लष्करप्रमुखांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पाठवेलल्या पत्रात मोदींच्या सैन्याबाबतच्या वक्तव्याचा आणि विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो बॅनरवर लावण्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे. राजकीय नेते सैन्याच्या कारवायांचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, असे माजी लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  युद्धभूमीपासून ते देशातील विविध ठिकाणी आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो. पण, कर्तव्य बजावत असताना कधीही भेदभाव केला नाही, असे माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

  राष्ट्रपती हे लष्कराचे सुप्रीम कमांडर असतात. आम्ही नेहमीच राष्ट्रपतींच्या आदेशाचे पालन करतो, असे म्हणत माजी लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलंय की, “तुम्हाला माहित आहे की, सैन्यात असताना कोणताही सैनिक सार्वजनिकरित्या व्यक्त होत नाही. कारण सैनिक सैन्याचे प्रत्येक नियम पाळत असतो. आम्ही माजी सैनिक नेहमीच सैन्याबाबत विचर करत असतो आणि त्यांच्या मुद्द्यांवर बोलत असतो. त्यामुळेच आपल्याला हे पत्र लिहिले आहे.”


  माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्रात योगी आदित्यनाथांचा उल्लेख
  या पत्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी सैनिकांना ‘मोदी की सेना’ म्हटले होते. गाझियाबादमध्ये प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी सैनिकांना ‘मोदी की सेना’ म्हटले होते.

  सैन्याच्या कारवाईचा राजकीय वापर होत असल्याची खंत व्यक्त करणारे पत्र ज्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिले, त्यात जनरल एसएफ रोडरिग्स, जनरल शंकर रॉय चौधरी, जनरल दीपक कपूर, अॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, अॅडमिरल विषअणू भागवत, अॅडमिरल अरुण प्रकाश, अॅडमिरल सुरेश मेहता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 3 जनरल, 4 अॅडमिरल, 11 लेफ्टनंट जनरल, 3 व्हॉईस अॅडमिरल, 15 मेजर जनरल यांसह इतर माजी लष्करी अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रपतींना हे पत्र लिहिले आहे.

Trending