आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षाच्छादनासाठी झटतेय मराठवाड्यातील १६ लाख ऑनलाइन ‘ग्रीन आर्मी’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - राष्ट्रीय व राज्य वन धोरणानुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वृक्षाच्छादित असणे गरजेचे असताना, ते प्रमाण केवळ २० टक्क्यांपर्यंत आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहे. शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांना मोफत रोपे देऊन लागवडीवर भर दिला. या उपक्रमात प्रत्येकाचा सहभाग वाढवण्यासाठी राज्यभरातून ६२ लाख १४ हजार ५६४ जणांनी नोंदणी केली आहे, तर मराठवाड्यातून १६ लाख २३ हजार ४८ ऑनलाइन झालेली ‘ग्रीन आर्मी’ वृक्षच्छादनासाठी झटत आहेत.
वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढीच माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठीदेखील अत्यंत उपयुक्त आहेत. शुद्ध हवेपासून ते वन उपजांपर्यंत विविधांगांनी वने ही माणसाच्याा दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत. त्या‍मुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण, संवर्धन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याने त्या दृष्टीने विभागाने कामाची दिशा ठरवली आहे. वने ही माणसाला मिळालेली एक नैसर्गिक संपदा आहे. 


वनांचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक आहे उत्तम वन व्यवस्थापन. वने ही प्रामुख्याने जमीन, वनस्पती, झाडे, प्राणी, सूक्ष्म जीवजंतू यांनी बनलेली असतात. वनातील हे घटक एकमेकांना पूरक स्वरूपाचे काम करतात. त्यामुळे सजीव सृष्टीचा समतोल राखण्यास मदत होते. यापैकी कुठल्याही एका घटकात बदल झाला तर पर्यावरणाची साखळी विस्कळीत होते. यामुळे राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू केलेला आहे. चालू वर्षात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ कालावधीत प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात वृक्ष लागवडही सुरू झाली आहे. अनेक शाळांनी वृक्ष दिंडी काढून उत्साहात लागवडीस सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्याला १ कोटी ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. पहिल्या दिवशी अनेक शाळा, संस्था, स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होऊन या उपक्रमास सुरुवात केली आहे. या उपक्रमाची जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती व्हावी, या दृष्टीने हरितसेना महाराष्ट्र अंतर्गत ग्रीन आर्मीअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करून घेत हा उपक्रम राबवला जात आहे.

 

या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेते ग्रीन आर्मी 
वन विभागामार्फत आयोजित केलेले कार्यक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवून वृक्ष लागवड, वृक्षदिंडी, वन विभागामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभाग, वन महोत्सव, पर्यावरण संवर्धनासाठी प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली इत्यादी जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवण्यासह निसर्ग व पर्यावरणाशी निगडित कार्यक्रमांत, उपक्रमांत हिरीरीने सक्रिय सहभागी होऊन जनजागृती करतात.

 

स्वयंसेवकांना प्रमाणपत्र
जे स्वयंसेवक वर्षभर सक्रिय सहभाग घेतील, त्यांची शासनामार्फत विशेष दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्र किंवा पारितोषिक देऊन पुरस्कृत केले जाणार आहे. स्वयंसेवक यातून विविध वृक्षारोपण, वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षण या बाबत जागरूक होऊन सामाजिक आणि पर्यावरण बांधिलकी जपत सहभागी व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडतील, स्वयंसेवकांना विविध वन क्षेत्रे, अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पात लागणाऱ्या प्रवेश शुल्कात व इतर शुल्कात सवलत देण्याची तरतूद शासनाच्या विचाराधीन आहे.
 

 

३० टक्केही लागवड नाही
मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्याला १ कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. ३० सप्टेंबरपूर्वी ही वृक्ष लागवड पूर्ण करावयाची आहे. परंतु आजपर्यंत एका जिल्ह्यानेही ३० टक्क्यांपेक्षा जास्त वृक्ष लागवड केलेली नाही.
 

बातम्या आणखी आहेत...