आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरण उशाला कोरड घशाला : ऐन पावसाळ्यात पैठण तालुक्यात १६ टँकर; ५० हजारांवर नागरिक टँकरच्या पाण्यावरच विसंबून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण  - पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही पैठण तालुक्याला पावसाने वाकुल्या दाखवल्या. जायकवाडी जलाशय उशाला असलेल्या या तालुक्याला दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  तालुक्यात पावसाने अद्यापही जोरदार हजेरी लावली नसल्याने तालुक्यातील ५० हजारांवर नागरिकांना भर पावसाळ्यात टँकरच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. 

तालुक्यातील १४   गावांना १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या ३४ खेपा हाेतात. बालानगर, पारंडी, तुपेवाडी, थेरगाव, दावरवाडी, नांदर, घारेगाव, हिरापूर, थापटीतांडा, देवगाव तांडा आदी भागात पुन्हा  खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून काही गावांत तर आजही पाणी  विकत घेऊन तहान भागवावी  लागत आहे.  मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात सध्या ९१ टक्के  पाणी साठा असताना पैठण तालुका टँकरवर तहान भागवत आहे. नाशिक आणि जायकवाडी पाणलाेट क्षेत्रातील पावसावर जायकवाडी धरण भरले असले तरी तालुक्यातील सर्वच मध्यम  प्रकल्प कोरडेठाक आहेत.  येत्या काळात दमदार पाऊस झाला नाही तर तालुक्यात अभूतपूर्व पाणीबाणी निर्माण होण्याची भीती आहे. 

पैठण तालुक्यातील शेतकरी सलग दुष्काळी चक्रात अडकला असतानाच यंदा भर पावसाळ्यात पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून  सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही कमालीची घट झाली आहे. 

पावसाने केली निराशा
जून महिन्यातील  एक दोन पावसानंतर जुलै महिन्यात तरी धो-धो पाऊस बरसेल असे वाटत होते. परंतु अद्यापही दमदार पाऊस झाला नाही.  पिके काेमेजत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाची वक्रदृष्टी  कायमच आहे.  पावसाअभावी  पाणीटंचाई आणखी तीव्र झाली आहे. यंदा तर पावसाळा सुरू झाल्यानंतर टँकरची संख्या कमी होईल असे वाटत होते. मात्र पाऊसच नसल्याने  टँकर वाढवावी लागणार अशी परिस्थिती  निर्माण झाली आहे. तालुक्यात उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर  पावसाळा सुरू हाेताच बंद होतात. याही वर्षी ते बंद करण्यात आले होते. मात्र मागणी वाढल्याने पुन्हा टँकर सुरू करण्यात आले आहेत. 
 

खासगी टँकरवाल्यांकडून अडवणूक
तालुक्यात अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी ताे तुटपुंजा आहे. शिवाय अनेक खासगी टँकर पाणी विक्रीच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडवणूक करत आहेत. तालुक्यात पहिल्यांदाच एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 
 

गतवर्षीपेक्षा परिस्थिती गंभीर
गतवर्षीही तालुक्यात पाणीटंचाई होती. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई दिसून आली नाही. गतवर्षी पेक्षा या वर्षीच्या पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर आहे.   जोरदार पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या आणखी वाढणार आहे .
 

मार्चमध्ये सुरू हाेत्या टँकरच्या दीडशे खेपा 
मार्चमध्ये तालुक्यात टँकरच्या दीडशेवर खेपा सुरू हाेत्या. त्यानंतर मागणी वाढतच गेली.  जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. सुरुवातीला केवळ दहा टँकर  बंद करण्यात आले होते. त्यानंतर नियमितपणे सर्व टँकर बंद झाले. मात्र पावसाने दडी मारल्याने पुन्हा टँकरची मागणी झाल्याने १६ टँकर सुरू करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांत पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे.  शेतीच्या हंगामाचे नियोजन पूर्णत:  कोलमडले आहे.  एकीकडे पिकांची दुरावस्था असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. 
 

जायकवाडीचा तालुक्याला लाभ कमीच : 
जायकवाडीच्या पाण्यावरच टँकर भरले जातात. मात्र धरणाचे पाणी तालुक्यातील पंधरा ते वीस गावे वगळता इतर गावांना पाणी मिळत नाही. मध्यम प्रकल्पांत पाणी नसल्याने टँकरवरच लोकांना तहान भागवावी लागते. उशाला धरण असतानाही घशाला काेरड पडणारा पैठण तालुका एकमेवच म्हणावा लागेल.
 

पैठण तालुक्यात टँकरची मागणी वाढली आहे : 
सध्या १६ टँकर सुरू आहेत. टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. मात्र एकाही गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रयत्न करत आहाेत.  अद्यापही दमदार पाऊस नसल्याने  टँकर सुरू करण्यात आले आहेत.
-राजेश  कांबळे, पाणी पुरवठा अधिकारी, पंचायत समिती पैठण 

बातम्या आणखी आहेत...