आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 गेटमधून पाणी; निर्मितीनंतर प्रथमच पाचव्यांदा जायकवाडीतून विसर्ग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण : जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच धरणाच्या मुख्य २७ गेटमधून एकाच वर्षात पाचव्यांदा पाणी सोडण्यात येत असून ९० दिवसांपासून धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सध्याही १६ गेटमधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. १०२ टीएमसी क्षमता असलेल्या धरणात या तीन महिन्यांत १३६ टीएमसी पाणी आले असून आजपर्यंत गोदावरी पात्रासह कालव्यातून ४९ टीएमसी पाणी सोडण्यात आले, असून २२ मार्चला धरणाचा साठा मृतसाठ्यात गेल्यानंतर सर्वात जास्त पाण्याचा उपसा झाला होता. त्यानंतर २७ जुलै राेजी आवक सुरू झाली होती, ती आजही सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली.


यंदा पहिल्या वेळेस १५ आॅगस्टला पाणी सोडण्यात आले ते आज पाचव्यांदा पाणी सोडले जात आहे. या पूर्वी जे पाणी सोडले त्यात मराठवाड्यातील ९ बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून, सध्याही पाणी साठा शंभर टक्के असून तो साठा कायम ठेवून येणारे पाणी खाली सोडले जात आहे. धरणाच्या निर्मितीनंतर पाचव्यांदा पाणी सोडावे लागले, त्याचप्रमाणे पहिल्यांदाच २२ मार्चलाच जायकवाडीच्या मृतसाठ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागला, तर मागील चार वर्षांपासून धरण उन्हाळ्यात मृत साठ्यात आले. त्यामुळे सिंचन उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन या धरणाची निर्मिती झाली तो उद्देश बाजूलाच राहिला, आता तरी मुबलक साठा पाहता शेतीला मुबलक पाणी मिळणार अशी शक्यता अाहे.


जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील १८३३२२ हेक्टर शेती ओलिताखाली येते. गेल्या तीन वर्षांपासून धरणाचा पाणी साठ्यात विशेष वाढ न झाल्याने सलग तीन वर्षे धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले होते. यामुळे ज्या उद्देशाने धरणाची निर्मिती केली तो उद्देश मागे पडल्याची ओरड शेतकऱ्यांतून झाली. जायकवाडीचा पाणीसाठा दोन वर्षांनंतर शंभर टक्क्यांवर आला .

धरणाच्या कालव्यांद्वारे होतो पाणीपुरवठा
धरणावर डावा व उजवा असे दोन कालवे असून डावा कालवा हा २०८ किमी आहे, याची वहन क्षमता १००.०८ घ मी प्रतिसेकंद आहे. यावर औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यांतील १४१६४० हेक्टर शेती ओलिताखाली येते, तर उजवा कालवा १३२ किमी लांबीचा असून याची वहन क्षमता ६३.७१ घमी प्रतिसेकंद असून याच्या पाण्याखाली ४६६४० हेक्टर ओलिताखाली येते.

धरणाविषयी सविस्तर
- भूमिपूजन शास्त्री यांच्या हस्ते १८ आॅक्टोबर १९६५.
- डिसेंबर १९७३ ला धरण पूर्णत्वास.
- प्रथम पाणी साठवण्यास सुरुवात २३ मे १९७४.
- २४ फेब्रुवारी १९७६ ला इंदिरा गांधी यांच्या हस्ते द्वार बसवणे.
- सर्वप्रथम सिंचन आॅक्टोबर १९७६.

यापूर्वी जायकवाडी धरण भरले
सन १९८३ ला ९३.८७ टक्के
सन १९८८ ला ९४.४ टक्के
सन१९९० ला ९१.०४ टक्के
सन १९९१ ला १०० टक्के
सन ११९५ ला ८८.१६
सन १९९९ ला ९७.९३ टक्के
सन २००० ला ९९.८३ टक्के
सन २००५ ला १०० टक्के
सन २००६ ला १०० टक्के
सन २००७ ला १०० टक्के
सन २००८ ला १०० टक्के
सन २००९ ला १०० टक्के
२०१९ ला १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण निर्मितीनंतर पाचव्यांदा पाणी सोडण्याची पहिलीच वेळ.
 
सध्या जायकवाडी धरण परतीच्या पावसाने पुन्हा शंभर टक्के भरल्याने विसर्ग दि. ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. एकूणच यंदा पाचव्यांदा धरणाच्या २७ पैकी काही गेट उघडून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रब्बी पिकांना याचा लाभ होणार आहे. छाया : ऋषिकेश भगत
 

बातम्या आणखी आहेत...