आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१.८५ कोटी मतदारांच्या हाती १७९ उमेदवारांचे भवितव्य; १० मतदारसंघांतील २० हजार केंद्रांवर आज मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघात आज गुरुवार, १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहेत. या टप्प्यात १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकूण १७९ उमेदवार रिंगणात असून २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे २१०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे. 


या टप्प्यातील सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदारसंघात असून सर्वात कमी १० उमेदवार लातूर मतदारसंघात आहेत. याव्यतिरिक्त बुलडाणा १२, अकोला ११, अमरावती २४, हिंगोली २८, नांदेड १४, परभणी १७, उस्मानाबाद १४ आणि सोलापूर मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

 

मतदानास ११ प्रकारची ओळखपत्रे वैध
मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर या सुविधा : मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे १० टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

 

६३ हजारांवर ईव्हीएम, २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर 
१५ पेक्षा जास्त उमेदवार असलेले ४ मतदारसंघ आहेत. यापैकी बीड मतदारसंघात एका कंट्रोल युनिटमागे ३ बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य ६ मतदारसंघात प्रत्येकी १ बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम (३७ हजार ८५० बॅलेट युनिट आणि २४ हजार ८५० कंट्रोल युनिट) तर सुमारे २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...