आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-सेनेचे नमोराज्य; काँग्रेस-राष्ट्रवादीचं मनोराज्य भंगले, राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - २०१४ च्या माेदी लाटेत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागा पटकावणाऱ्या भाजप- शिवसेना युतीने या यशाची २०१९ च्या निवडणुकीतही पुनरावृत्ती केली.   त्यात भाजपला २३, तर शिवसेनेने १८ जागा कायम राखल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस केवळ एका जागेवर मर्यादित राहिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेल्या वेळेप्रमाणे ४ जागा कायम राखल्या. वंचित आघाडीने यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीची दमछाक करत औरंगाबादेतून एक जागा निवडून आणली. १७व्या लोकसभेत महाराष्ट्रातून १९ नवीन चेहरे जात आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिघडलेली युतीची घडी एेन निवडणुकीच्या ताेंडावर पुन्हा सावरल्यामुळे शिवसेना- भाजपला पूर्वीचे यश कायम राखता आले. मात्र, या दाेन्ही पक्षांचे प्रत्येकी एका केंद्रीय मंत्र्याला पराभवाचा धक्का बसला. 

 

लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार न उतरवता पंतप्रधान नरेंद्र माेदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आव्हान देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ‘झंझावाता’चा युतीच्या घाेडदाैडीवर किंचितही परिणाम झाला नाही. 

 

यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची माेठ्या प्रमाणावर धूळधाण झाली. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.  दस्तुरखुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ८ सभा घेऊन माेदींविराेधात वातावरण ढवळून काढले, मात्र यापैकी एकाही मतदारसंघात उमेदवार निवडून आणणे शक्य झाले नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावून बहुतांश मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणले. महाराष्ट्रातून प्रथमच एखादा धर्मगुरू लाेकसभेत पाठवण्याचा इतिहासही या निवडणुकीने घडवला.

 

पक्षांतर केलेले आठ उमेदवार विजयी
> प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड (सेनेतून भाजपत)
> आ. सुरेश धानोरकर, चंद्रपूर (शिवसेनेतून काँग्रेसमध्ये)
> भारती पवार, दिंडोरी (राष्ट्रवादीतून भाजपमध्ये)
> अमोल कोल्हे, शिरूर (शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये)
> सुजय विखे, नगर (काँग्रेसमधून भाजपमध्ये)
> रणजितसिंह निंबाळकर, माढा (काँग्रेसमधून भाजपत)
> खा. राजेंद्र गावित, पालघर (भाजपमधून शिवसेनेत)
> धैर्यशील माने, हातकणंगले (राष्ट्रवादीतून शिवसेनेत)

 

काँग्रेसला एकच जागा, तीही आयात केलेल्या सुरेश धानोरकर यांची
काँग्रेसला महाराष्ट्रातून केवळ एकच जागा मिळाली, तीही पक्षांतर केलेल्या उमेदवाराकडून. शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे आमदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतके असूनही केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि चार वेळेचे खासदार हंसराज अहीर यांचा पराभव करत धानोरकर हे जायंट किलर ठरले.

 

२ मंत्री, २ माजी सीएम, पवारांचा नातूही पराभूत

पार्थ पवार, मावळ
2.16 लाख मतांनी पराभव
शरद पवार यांचे नातू आणि मावळचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना श्रीरंग बारणेंकडून पराभव पत्करावा लागला.

 

अशोक चव्हाण, नांदेड
40 हजार मतांनी पराभव
दोन वेळचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी धूळ चारली.


अनंत गीते, रायगड
31 हजार मतांनी पराभव
सहा वेळचे खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी हरवले.


हंसराज अहीर, चंद्रपूर
44 हजार मतांनी पराभव
केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि अनुभवी खासदार हंसराज अहीर यांना बाळू धानोरकर यांनी पराभूत केले.


राजू शेट्टी, हातकणंगले
96 हजार मतांनी पराभव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना धैर्यशील मानेंनी झटका दिला.


सुशीलकुमार शिंदे, सोलापूर
1.58 लाख मतांनी पराभव
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.

बातम्या आणखी आहेत...