आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी १८ लाखांची फसवणूक, दाेघांविराेधात गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - ‘सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याची १८ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. या विद्यार्थ्याचे वडील राजेश मिश्रा यांनी फसवणूक करणाऱ्या दाेघांविराेधात पाेलिसांत तक्रारही दाखल केली आहे,’ अशी माहिती स्वत: मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राजेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा गाैरव याला नीट परीक्षेत १९५ गुण होते. मात्र त्याला मेडिकलसाठी प्रवेश मिळत नव्हता. याच वेळी आदित्य रॉय नामक व्यक्तीने ‘२५ लाख रुपये दिल्यास सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयात तुमच्या मुलाला मेडिकलसाठी प्रवेश मिळवून देताे’ असे राजेश मिश्रा यांना फाेनवरून सांगितले. नंतर १८ लाखांत हा व्यवहार ठरला. 

१९ जुलै २०१९ रोजी गौरव हा आई-वडिलांसह नागपुरात आला. आदित्य रॉय यांनी या तिघांना सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कार्यालयात नेले. तिथे राजेश मिश्रा यांनी १० लाख व २ लाख ९४ हजारांचा धनादेश कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नावाने दिला होता. विद्यार्थ्यांच्या वडिलांनी १० लाख व धनादेश दिल्यानंतर त्यांना कोऱ्या कागदावर मुलाला प्रवेश मिळाल्याचे पत्र संस्थेचा स्टॅम्प मारून दिले होते. उर्वरित शिल्लक रक्कम देण्यासाठी त्यांना १३ ऑगस्ट राेजी मिश्रा यांना वर्धा येथे बोलावले हाेते. राॅय यांनी त्यांना वर्धेतील आनंद आश्रम या हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले. आदित्य रॉय व तिवारी या दाेघांनी मिश्रा परिवाराला सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कार्यालयात नेले. तिथे गेल्यानंतर मिश्रा यांनी उर्वरित ८ लाख दिले व तसे पत्रावर नमूद केले. १६ ऑगस्ट राेजी गाैरवचे अॅडमिशन हाेईल, असेही सांगण्यात आले हाेते. मात्र १४ आॅगस्ट राेजीच राॅय व तिवारी यांनी मिश्रांना फाेन करून सांगितले की पावसाचा जाेर वाढल्यामुळे अॅडमिशनची तारीख पुढे ढकलली आहे. मनात शंकेची पाल चुकचुकल्याने शर्मा यांनी सेवाग्राम येथील कुलपती डॉ. गगणे यांना या प्रकरणाची माहिती दिली. डॉ. गगणे यांनी या व्यवहाराशी आमच्या संस्थेचा काहीच संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर मिश्रा यांनी पाेलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी १७ आॅगस्ट राेजी राॅय व तिवारी यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जबलपूर येथील राजेश्वरनाथ पांडे या युवकाचीही १० लाखांची फसवणूक झाली आहे. आदित्य रॉय व तिवारी या दोघांनी अशा अनेक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार आपण सेवाग्राम पोलिस ठाण्यात दिल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१० लाख कर्ज काढून दिले पैसे : राजेश मिश्रा
‘आयुष्यभराची कमाई ८ लाख रुपये जमा करीत व १० लाख रुपयांचे कर्ज काढून असे १८ लाख आदित्य रॉय व तिवारी यांना मी दिले हाेते. तरीसुद्धा माझ्या मुलाला प्रवेश मिळाला नाही. माझ्या मुलाची फसवणूक झाली आहे. जे स्वप्न बघितले होते ते स्वप्न स्वप्नच राहिले आहे,’ असे राजेश मिश्रा म्हणाले.
 

पोलिस तपासात सत्य समाेर येईल : कुलपती
प्रवेश देण्याच्या नावावर विद्यार्थ्याची फसवणूक झाली आहे, अशी माहिती नाही. कुठल्याही प्रकारची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली नाही. पोलिस तपासात जे उघड होईल ते समोर येणार आहे, अशी प्रतिक्रिया सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे कुलपती डॉ. नितीन गगणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...