आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासाठी पुण्यात बाहेरचे १८ लाख विद्यार्थी; दुष्काळामुळे ४०% कामावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात बाहेरगावाहून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सुमारे १८ लाख. पैकी ४० टक्के, म्हणजेच ७ लाख २० हजार विद्यार्थी आहेत मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागातून आलेले.. पुण्यात ‘करिअर’ घडवण्याची इच्छा बाळगणाऱ्या या एकूणच विद्यार्थ्यांपैकी काही जणांपुढे अाज प्रश्न आहे तो ‘भाकरीचा चंद्र शोधण्याचा’ आणि काही जणांना प्रश्न पडतोय तो “दररोज नव्या नव्या चंद्रावर जाऊन भाकरी शोधण्याचा..!’  


पुण्यात विद्यार्थ्यांचा एक वर्ग असा आहे, की ज्यांना दररोजची शानशाैक, ब्रँडेड कपडे आणि गॉगल, स्पीडी बाइक्स किंवा चारचाकी वाहन, खाण्यासाठी पिझ्झा- बर्गर, संध्याकाळी बार आणि पब्ज.. तेही पहाटे पहाटेपर्यंत चालणारे.. त्यातला तो जल्लोष.. तो आनंद.. ती नशा यात वाहून जाणारा..  पैशांची बिलकुल चिंता नसलेला किंबहुना पैशांची मग्रुरी चेहऱ्यावर दर्शवणारा हा वर्ग.. तर दुसरीकडे मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, भूम, नांदेड, हिंगोली, परभणी या दुष्काळी टापूतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये स्वतःच्या आयुष्याचे स्वप्न असते. आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या पाठीवर असते. त्यांच्यासाठी बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम. यांसारखे अभ्यासक्रम म्हणजेच उच्चशिक्षण असते. महापालिका संचालित ‘बार्टी’चे वसतिगृह असेल किंवा मराठवाडा वसतिगृह या ठिकाणी त्यांच्या निवाऱ्याची सोय होते. रोजच्या डब्याची व्यवस्था मात्र त्यांनाच करावी लागते. ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही, अशी मुले सोमवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, डेक्कन अशा मध्यवर्ती भागात खोली घेऊन राहतात. खोलीचे भाडे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी २५०० रुपये. एका खोलीत साधारण चार मुलांनी राहायला हवं खरं तर; पण इथे तर ८ ते १० मुलांना दाटीवाटीने राहावे लागते. मेसच्या डब्यासाठी मोजावे लागतात आणखी २५०० रुपये.. एकूण हिशेब केला तर या मुलांना साधारणतः आठ हजार रुपये खर्च लागतो. गावाकडे आई-वडील शेतीमध्ये राबतात. पोटाला चिमटा घेऊन मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पाठवत राहतात. त्यांच्याही नजरेत एक स्वप्न असते. मुलगा, मुलगी शिकेल, आपल्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढेल. दुष्काळामुळे सहा ते सात महिने पालकांची प्रचंड ओढाताण होते. गावाकडे प्यायला पाणीही नसते. रोजगार हमीची कामे चालू नसतात. उत्पन्नाचे साधनच नसते. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची जिथे भ्रांत आहे, तिथे मुलाला शिक्षणासाठी पैसा ते कुठून पाठवणार? त्यामुळे या काळात मुलांना घरून सांगितले जाते की, ‘बाबा रे.. सुटी लागली तरी गावाकडे काही येऊ नकोस. तू तिथेच राहा आणि तुझे तूच बघ.. ‘ अशा विद्यार्थ्यांची संख्या पुण्यामध्ये खूप मोठी आहे.
जिथे अंधार; तिथे उजेडही आहे!!


परिस्थितीची जाण असलेली ही मुले डगमगत  नाहीत. ती जॉब शोधतात. मग कुणी सिक्युरिटी म्हणून काम पाहतात. कुणी टेलिफोन ऑपरेटर होते. रिसेप्शनिस्ट होते. काही जण कारखान्यात हेल्पर म्हणून कामाला जातात, तर काही जण केटरर्सकडे काम करतात. त्यातून कसेबसे पैसे सुटतात आणि मग पोटाची खळगी भरण्याचा मार्ग मोकळा होतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये साडेचारशे विद्यार्थी राहतात. वेगवेगळ्यामहाविद्यालयांतून त्यांचे शिक्षण चालू आहे. विष्णू राजेंद्र माने हा असाच एक विद्यार्थी उस्मानाबादचा. खोलीचे भाडे आगाऊ द्यावे लागते, न दिल्यास मालक रातोरात घराबाहेर काढतो.. अशा वेळी बहुधा बाकीची मित्रमंडळी सावरून घेतात एकमेकांना..! विष्णू सध्या केटरर्सकडे जॉब करतोय.. निवृत्ती सोपान तिघोटे एम. ए. इकॉनॉमिक्सला आहे. चार वर्षांपासून तो पुण्यातच राहतो. शनिवार आणि रविवारी केटरिंगचे काम करावे लागते. सचिन पुजारे हा त्याचाच मित्र. विनायक रेणेवाड बिलोली तालुक्यातला. एम.ए. करतोय. कपड्यांच्या दुकानात पार्टटाइम काम करतो. दीपक घाडगे वाचनालयामध्ये, तर प्रिया कुलकर्णी ग्राहक पेठेमध्ये नोकरी करते. साधारण चार ते साडेचार हजार रुपयांचे उत्पन्न या नोकरीतून मुलांना मिळते.

 

गावी दुष्काळाचे चटके, नशिबाचे भाेग शहरातही 
बी.एस्सी., एम.एस्सी. झालेले काही विद्यार्थी कंपनीत नोकरी करत आहेत. ही सारी मुले, या मुलांपुढे एक आदर्श आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून, पदोपदी येणाऱ्या संकटांवर मात करून आपल्या ‘भाकरीचा चंद्र’ शोधण्यामध्ये प्रत्येक जण व्यग्र आहे.  दुष्काळाचा फटका केवळ दुष्काळ असलेल्या गावांतच बसतो असे नाही, तर पुण्यासारख्या ठिकाणी जिथे मध्यवस्तीत पाण्याचा प्रश्न फारसा गंभीर नाही, तिथेही  शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याचे भोग अशा पद्धतीने भोगावेच लागतात आणि त्यालाही कारणीभूत ठरतो आहे दुष्काळ!

 

यशस्वी उमेदवारांचा डाेळ्यासमाेर अादर्श
नुसते शिक्षण काही कामाचे नाही, याची जाणीव या मुलांना आहे. त्यामुळेच पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यामध्येही ही मुले पुढे आहेत. अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने ते आपल्या आयुष्याचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात आहेत आणि या मुलांपुढे आदर्श आहे तो त्यांच्यासारखेच आयुष्य शिक्षणासाठी घालून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठे सरकारी पद मिळवलेल्या त्यांच्याच सहकाऱ्यांचे..! त्यापैकीच एक आहे उमेश मोरे. हा मुलगादेखील मराठवाड्याचा. नुकताच पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा तो पास झाला. परंड्याचा राम भांगे आता विक्रीकर अधिकारी झालाय. तो पूर्वी बीएसएनएलमध्ये काँट्रॅक्ट बेसिसवर नाइट शिफ्टला काम करायचा. अनेक विद्यार्थी मंत्रालयात सहायक म्हणून नोकरीला लागलेत.