आता प्रत्येक १०० पैकी १८ ग्राहक नव्या प्रकल्पात घर खरेदीस तयार, गेल्या वर्षी ५% होता आकडा, रेडी-टू-मूव्हला प्रथम पसंती

वृत्तसंस्था

Apr 25,2019 10:52:00 AM IST

नवी दिल्ली - ग्राहकांची पहिली पसंती “रेडी-टू-मूव्ह’ घरांना कायम आहे. मात्र, त्याच बरोबर एक एप्रिलपासून जीएसटी दर कमी झाल्यानंतर नवीन लाँच झालेल्या प्रकल्पांतही घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. मालमत्ता कन्सल्टंट एनाराॅकच्या एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. चालू वर्षीच्या पहिल्या सहामाहीसाठीच्या या सर्व्हेनुसार रेरा कायदा आणि जीएसटी दर कमी झाल्याने नवीन प्रकल्पांवरील ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ७० टक्के लाेकांनी ८० लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर १८ टक्के लाेकांनी नवीन प्रकल्पात घर खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. या आधीच्या सर्व्हेमध्ये हा आकडा केवळ पाच टक्के हाेता.


एनाराॅकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, कायदेशीर सुधारणांमुळे रियल इस्टेट मार्केटच्या वातावरणात सुधारणा झाली असल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेमुळे या क्षेत्राकडे परत
वळत आहेत.

अर्थसंकल्पातील उपायांचा परिणाम
अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने संपत्तीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना माेठा दिलासा दिला आहे. यामध्ये रंेटल इन्कमवरील टीडीएस मर्यादा १.८ लाख रुपयांवरून वाढवून २.४ लाख रुपये करण्यात आल्याचाही समावेश आहे, तर दुसरीकडे एखाद्याने स्वत:चे घर विक्री करून त्या रकमेतून दाेन घरांची खरेदी केली तर त्याला भांडवली वाढ कर लागणार नाही.

गुंतवणुकीसाठी घराची खरेदी करणारे ६२ टक्के परताव्याबाबत समाधानी
> 58% ग्राहक स्वत:च्या वापरासाठी, तर ४२ टक्के ग्राहक गुंतवणुकीसाठी घर खरेदी करणार आहेत.
> 32% ग्राहकांनी गेल्या वर्षी गुंतवणुकीसाठी घर खरेदी केले. त्यांच्या संख्येत १० टक्के वाढ.
> 62% लाेकांनी ५ वर्षांत गुंतवणुकीसाठी घराची खरेदी केली, त्यांचा परतावा समाधानकारक आहे.

X
COMMENT