आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने पुणे येथील उष्णदेशीय हवामान खात्याकडून कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीवरून प्रयोगाचे नियंत्रण ठेवले जात आहे. जिल्ह्यात पुढील ९० दिवसांत १८० तास उड्डाणाद्वारे कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला जाणार आहे. यासाठी २५ जणांची टीम कार्यरत असून सोलापूर विमानतळावर दोन विमानेही सज्ज अाहेत. ढगांची उपलब्धता पाहून प्रतिदिन दोन तपास विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थेच्या प्रकल्प संचालिका डॉ. तारा प्रभाकरन यांनी दिली. यापूर्वी औरंगाबाद विमानतळावरून ३ जूनपासून ६० तास उड्डाणाद्वारे प्रयोग राबविण्यात आला आहे. पण उड्डाणाबाबत अडचण आल्याने सोलापूर विमानतळाची निवड करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यात पुढील तीन महिने कृत्रिम पावसाचा प्रयाेग करण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी विमानाद्वारे त्याची चाचपणीही करण्यात अाल्याचे डॉ. प्रभाकरन यांनी स्पष्ट केले. यापूर्वी वाराणसी, हैदराबाद याठिकाणीही प्रयोग झाले आहेत. ढगाची उपलब्धता व बलूनद्वारे मिळणाऱ्या माहितीनुसार मोहीम राबविण्यात येईल.
सोलापूर विमानतळावर दोन विमाने तैनात केली आहेत, पैकी एक विमान ढगांचा अंदाज घेईल तर दुसरे विमान कृत्रिम पाऊस पडण्यासाठीची प्रक्रिया करणार आहे. हवाई अंतर २०० कि.मी. परिसरात विमानाद्वारे प्रयोग करण्यात येणार आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयोग राबविण्यात येणार आहे. मात्र नेमका किती पाऊस पडला, याची अचूक माहिती कळण्यासाठी जिल्ह्यातील ८० ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.
मागील वर्षापासून सुरू आहे प्रयोग...
जून २०१६ मध्ये ग्राऊंड साईट निश्चित केली आहे. २०१७ पासून आम्ही प्रयोग करीत असून मे २०१८ पासून ते आजपर्यंत ढगांचा अभ्यास करण्यासाठी सोलापूर येथून ३६५ बलून सोडण्यात आले आहेत. या बलूनद्वारे ढगांची उपलब्धता, आर्द्रता, तापमान, वाऱ्याची दिशा याचा नेमका अंदाज घेता येतो. हे बलून ३० ते ३५ कि.मी. उंचीवर जातात. ढगांची अचूक माहिती संबंधित टीमला उपलब्ध होते. यावरून िवमानाद्वारे क्लाऊड सिडिंग करायचे की नाही ? याचा निर्णय घेतला जातो. २०० कि.मी. परिसरापर्यंत क्लाऊड सिडिंग करता येऊ शकते.
या कारणामुळे बदलले विमानतळ...
औरंगाबाद विमानतळावरून ३ जून २०१८ पासूनच कृत्रिम पावसाच्या प्रयोगास सुरुवात करण्यात आली आहे. पण औरंगाबाद विमानतळावरून कृत्रिम पाऊस प्रयोगासाठी होणारी उड्डाणे आणि पुणे विमानतळावरून संरक्षण विभागाच्या विमानांची सरावासाठी होणारी उड्डाणे यांची एकच वेळ झाल्याने कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंधने येत होती. सोलापूर विमानतळ संरक्षण विभागाच्या उड्डाण कक्षेत येत नसल्याने कृत्रिम पाऊस प्रयोगासाठी सोलापूर विमानतळाची निवड करण्यात आली आहे. पुढील तीन महिने सोलापूर विमानतळावरून कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू राहणार असल्याचे डॉ. प्रभाकरन यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.