आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीविषयक स्थायी समिती बैठकीला 31 पैकी १९ खासदारांनी मारली दांडी, पंचतारांकित हाॅटेलात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : संसदेची कृषीविषयक स्थायी समिती गुरुवारी नागपुरात आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी प्रतिनिधी तसेच कृषी िवभाग यंत्रणेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दोन सत्रांत बैठका घेण्यात आल्या. रविभवन येथे मोठे सभागृह असताना रॅडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हाॅटेलात बैठक घेण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

३१ खासदारांचा समावेश असलेल्या समितीत पैकी १२ खासदार आले. कर्नाटकचे खासदार पर्वतागाैडा चनन्नागौडा गड्डीगौदार हे समितीचे अध्यक्ष आहेत. इतर खासदारांमध्ये अफझल अंसारी, ए. गणेशमूर्ती, कनकमल कटारा, भागवत खुबा, देवजी मनीसंग्राम पटेल, शारदाबेन अनिलभाई पटेल, नवनीत राणा, रामकृपाल यादव, कैलाश सोनी, छाया वर्मा आदींचा समावेश आहे.

या समितीसमोर प्रधानमंत्री पीकवीमा योजनेवर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शेतकरी नेते विजय जावंधीया, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अजित नवले, नांदेडचे प्रल्हाद इंगोले, शिवाजीराव देशमुख आदींनी सुधारणा सुचवल्या. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, भारतीय किसान संघाचे महामंत्री मदन देेशपांडे, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आदी या वेळी उपस्थित होते.

या संस्थांना देणार भेटी

शुक्रवार, २४ रोजी समिती केंद्रीय कापूस संशोधन संस्था, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थेला भेट देऊन माहिती घेणार आहे. या वेळी सर्वच शेतकरी नेत्यांनी उंबरठा उत्पन्न ठरवण्याची पद्धत बदलण्यावर भर दिला. शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार अपेक्षित उत्पन्नाच्या जवळ जाणारे उंबरठा उत्पन्न हवे, असे म्हणणे मांडले. उंबरठा उत्पन्न ठरवण्याच्या पद्धतीत बदल केला तरच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले. वातावरण बदलाचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अशा वातावरणात पीक विम्याची खूप गरज आहे. फक्त त्यात काही बदल आवश्यक असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.

वैयक्तिक विम्याप्रमाणे पीक विमाही वैयक्तिक हवा, असे स्पष्ट मत कृषिभूषण प्रकाश पाटील यांनी मांडले. पिक विमा योजना ही पिक कापणी प्रयोगाच्या आधावर आहे. दुष्काळ दाखवता यावा म्हणून पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी कमी दाखवली जाते. त्यामुळे उंबरठा उत्पन्न कमी येते. परिणामी उत्पादकता कमी दिसते. म्हणून केंद्र सरकार आयात करते. आणि नंतर शेतमालाचे भाव कोसळतात. त्यामुळे उंबरठा उत्पन्न काढण्याची पद्धतच बदलायला हवी, असे पाटील म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...