आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदचा मेहुणा पारकरची हत्या करणाऱ्यास 22 वर्षांनंतर अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या नवऱ्याची हत्या करणाऱ्यास अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मागील २२ वर्षांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. दयानंद पुजारी ऊर्फ सलियन असे या आरोपीचे नाव असून तो डॉन अरुण गवळीच्या टोळीचा सदस्य होता. 

 

१९९२ मध्ये मुंबईच्या जे.जे रुग्णालय परिसरामध्ये दोन टोळ्यांत झालेल्या चकमकीत दाऊदची बहीण हसीनाचा नवरा इब्राहिम पारकरला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. ही हत्या सलियनने केल्याचे उघडकीस झाले. मात्र, तो फरार झाला. १९९२ मध्येच पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, १९९६ मध्ये न्यायालयाने जामीन दिल्याने तो तुरुंगातून बाहेर पडला. दरम्यान, मुंबईत प्रचंड गँगवाॅर वाढले होते. त्यातच मेहुण्याची हत्या झाल्याने संतापलेला डॉन दाऊद इब्राहिमही सलियनचा वचपा काढण्यासाठी जिवाचे रान करत होता. त्याने सलियनच्या शोधासाठी अख्खी टोळी कामाला लावली होती. त्यामुळे सलियन भूमिगत झाला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मागील २२ वर्षांमध्ये तो कधी हॉटेलमध्ये काम करायचा तर कधी एखाद्या ढाब्यावर झोपायचा. फरार झाल्यानंतर त्याने कुटुंबीयांशी संपर्क तोडून टाकला होता. अटकेपूर्वी तो उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका ढाब्यावर काम करत होता. दरम्यान, मुंबईतील कांजूरमार्गस्थित घरी तो आईवडिलांना भेटायला येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचत त्याला पोलिसांनी घरातून अटक केली.    


दाऊदचा २१ वर्षांपासून फरार साथीदारही अटकेत
दाऊद इब्राहिमचा जुना साथीदार मोहंमद अहमद खान महाडिकलाही ठाणे पोलिसांनी मुंब्रा भागातील कौसामधून अटक केली आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत हत्या व अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. १९९७ मध्ये जामिनावर सुटका झाल्यापासून तो फरार होता. कर्नाटकमधील खोटा पत्ता देत त्याने पठाण युसूफ खान उस्मान डंडेली या नावाने बनावट पासपोर्ट बनवत मस्कतमध्ये पलायन केले.  काही दिवसांपूर्वीच तो कुटुंबीयांसह मुंबईत परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जोसेफ नामक व्यक्तीने त्याला बनावट पासपोर्ट बनवून दिले होते. 

 

१९९२ मध्ये जे. जे. रुग्णालयाजवळ झाली चकमक  
नव्वदीत मुंबईत अनेक गुंडांच्या टोळ्या वर्चस्वासाठी कारवाया करत होत्या. त्यातच १९९२ मध्ये जेजे रुग्णालयाच्या परिसरात अरुण गवळी टोळीच्या चार सदस्यांनी हसीना पार्करचा पती इब्राहिमची हत्या केली. या चकमकीत गुंड शैलेश हळदणकरही ठार तर बिपिन शेरे जखमी झाला होता. दरम्यान, सलियन हा त्याच्या काही साथीदारांसह फरार झाला. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने इब्राहिमच्या हत्येची कबुली दिली होती. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रास्त्रप्रकरणी गुन्हा दाखल होता.

बातम्या आणखी आहेत...