१९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोटाचा आरोपी अब्दुल गनी तुर्कचा मृत्यू; नागपूर कारागृहात भोगत होता मृत्यूदंडाची शिक्षा

दिव्य मराठी

Apr 26,2019 10:31:00 AM IST

नागपूर - १९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोटप्रकरणी नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी अब्दुल गनी तुर्कचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याच्यावर अर्धांगवायूचा झटका आल्याने उपचार सुरू होते.


मुंबईतील सेंच्युरी बाजार येथे पेरण्यात आलेल्या आरडीएक्सच्या स्फोटात १२ मार्च १९९३ रोजी ११३ लोक ठार तर, २२९ जखमी झाले होते. विशेष टाडा न्यायालयाने त्याला २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठाेठावली होती. तेव्हापासून तो नागपूर कारागृहात होता. माहीम येथील टायगर मेमनच्या घरून आरडीएक्स असलेली कमांडर जीप सेंच्युरी बाजारपर्यत चालवत आणल्याच्या आरोपाखाली अब्दुल गनी तुर्कला शिक्षा झाली होती.
या प्रकरणी साक्षीदारांनी अब्दुल गनी तुर्कविरोधात दिलेल्या भक्कम पुराव्यांवरून तत्कालीन न्यायमूर्ती पी. डी. कोदे यांनी अब्दुलला कठोर शिक्षा ठोठावली होती. “आरडीएक्स स्फोटकाने भरलेली कमांडर जीप आपणच सेंच्यूरी बाजार येथे घेऊन आलो व पार्क केली. जीप पार्क केल्यानंतर आपण नमाज पठण केली होती,’ असे त्याने कबूल केले. अर्धांगवायूचा झटका आल्याने आजारी असलेल्या अब्दुलला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

X