Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 19,962 million cubic feet of water remaining in mula dam

'मुळा'च्या साठ्याला उतरती कळा; धरणात उरला १९ हजार ९६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

राजेंद्र वाडेकर | Update - Sep 03, 2018, 11:09 AM IST

सह्याद्रीतील घाटमाथ्यावर यंदा पाऊस लवकर थांबल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या मुळा धरणातील पाणीसाठ्याला उतरती कळा

 • 19,962 million cubic feet of water remaining in mula dam

  राहुरी शहर- सह्याद्रीतील घाटमाथ्यावर यंदा पाऊस लवकर थांबल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या मुळा धरणातील पाणीसाठ्याला उतरती कळा लागली आहे. शनिवारी सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १९ हजार ९६२ घनफूट होता. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणात पाण्याची आवक मोठी असल्याने धरणाच्या पाणीसाठ्याची २२ हजार ५४३ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. मागील वर्षीचा तुलनेत आजचा मुळा धरणातील पाणीसाठा तब्बल अडीच हजार दशलक्ष घनफुटाने कमी भरला आहे.


  लाभक्षेत्राबरोबरच मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाने एकाचवेळी दडी मारल्याची घटना गेल्या ५ वर्षांत दुसऱ्यांदा घडली आहे. सन २०१५ मध्ये पावसाने लाभक्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात पाठ फिरवल्याने पाण्याचे संकट उभे राहिले होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने यावर्षीदेखील पावसाळ्यातील काही काळ वगळता संपूर्ण तीन महिन्यांचा पावसाळ्याचा कालावधी निराशाजनक गेला. तीन महिन्यांत लागोपाठ ६ खात्रीचे नक्षत्रे कोरडे गेल्याने भविष्यात राहुरी तालुक्यात पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २१ सप्टेंबरला २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा २५ हजार ५०० दशलक्ष घनफूट झाल्याने जलसंपदा विभागाच्या परिपत्रकानुसार धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. यंदा घाटमाथ्यावर पाऊस नसल्याने मुळा धरणात शनिवारी सायंकाळी अवघी ११५८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने मुळा उजवा व डावा कालव्याचे पाणी आवर्तनाचा कालावधी आणखी काही काळ वाढणार आहे.


  रविवारी सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १९ हजार ९६२ दशलक्ष घनफूट होता. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणात पाण्याची आवक मोठी असल्याने धरणाच्या पाणीसाठ्याची २२ हजार ५४३ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. मागील वर्षीचा तुलनेत आजचा धरणाचा पाणीसाठा तब्बल अडीच हजार दशलक्ष घनफुटाने कमी भरला आहे.


  घाटमाथ्यावर पाऊस नसल्याने मुळा धरणात येणारी पाण्याची आवक थांबल्यात जमा आहे. उजवा व डावा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू असल्याने मुळा धरणाचा पाणीसाठा २० हजार ६ दशलक्ष घनफूट इतका उरला आहे.


  दरम्यान, हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्लागार समितीची राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या बैठकीत पुढील ५ दिवसांत होणारे वातावरणातील बदल जाहीर झाले आहेत. १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, आकाश ढगाळ, कमाल आर्द्रता ८४ ते ८७ टक्के, तर वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १५ किलोमीटर राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मात्र, तब्बल २ महिन्यांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाने पाठ फिरवल्याने तापमान, आर्द्रता, ढगाळ वातावरण व वाऱ्याचा ताशी वेग एवढ्या पुरती मर्यादित माहिती ऐकण्याची वेळ आली आहे.


  परतीच्या पावसावर शेतीपाण्याची मदार
  पावसाळ्यातील तीन महिन्यांचा कालावधी निराशाजनक गेल्याने परतीच्या पावसावर राहुरी तालुक्यातील शेतीच्या पाण्याची मदार अवलंबून राहणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामानावर आधारित असलेल्या भारत मौसम विज्ञान विभागाच्या साप्ताहिक बैठकीत कमाल तापमान, कमाल आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग एवढ्यापुरती मर्यादित माहिती मिळते. मात्र, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Trending