आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Crore 43 Lac Rupees Scam; Eight People, Including Two City Chiefs, Were Charged

2 कोटी 43 लाख रुपयांचा गैरव्यवहार; दोन नगराध्यक्षांसह 8 जणांवर गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील घरकुल बांधकामाची पाहणी केलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीने आपल्या अहवालामध्ये २ कोटी ४३ लाख ७९ हजार १७ रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पालिकेच्या तत्कालीन दोन नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदार कंपनी अशा एकूण ८ जणांवर शनिवारी रात्री नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

राज्य शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण, झोपडपट्टी निर्मूलन योजनेअंतर्गत नळदुर्ग येथील नगरपालिकेच्या वतीने शहरात तुळजापूर रोडवर सन २००८ मध्ये महत्त्वाकांक्षी १२०६ घरकुल उभारणीची जवळपास १८ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली होती. मात्र, या योजनेला दहा वर्षाचा कालावधी लोटला तरी अर्धा निधी उचलूनही फक्त ३०२ घरकुलांचे बांधकाम, विद्युत पोल, गटार, सिमेंट रस्ता आदी कामे करण्यात आली. मात्र, करण्यात आलेली कामेही दर्जाहीन झाल्याने, या निकृष्ट कामामुळे म्हाडाने एकाही लाभार्थीला घरकुलचे वाटप केले नाही. दरम्यान, या विरोधात शासनाकडे तक्रारी गेल्याने एप्रिल-मे २०१९ मध्ये बांधण्यात आलेल्या घरकुल, गटार व रस्ता बांधकामाची विभागीय आयुक्तांनी गठित केलेल्या समितीकडून पालिकेच्या तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समक्ष मे २०१९ मध्ये घरकुलाच्या बांधकामाच्या चित्रीकरणासह चौकशी करण्यात आली. यामध्ये घरनिहाय, बाबनिहाय मोजणी करून पाहणी करण्यात आली होती. या पथकाने सर्व पाहणी केल्यानंतर आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला.

दोन कोटी ४३ लाखांचा अनावश्यक खर्च


यामध्ये पथकाने बांधण्यात आलेल्या घरकुलावर पालिकेने खर्च केलेल्या रकमेपैकी जास्तीची रक्कम दोन कोटी ४३ लाख ७९ हजार १७ रुपये अनावश्यक खर्च झाला असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार ठेकेदार, तत्कालीन मुख्याधिकारी दिलीप देशमुख, तत्कालीन नगराध्यक्ष उदय जगदाळे, अध्यक्षा निर्मला गायकवाड, उपनगराध्यक्ष नय्यर पाशा जागीरदार, तत्कालीन नगर अभियंता ए. आर. खान,बांधकाम कंपनी मिनार कन्स्ट्रक्शन कंपनी, सयाजी इंजिनिअर कंपनी व संजय सुधाकर राजहंस यांच्याकडून संगनमताने सदरील रकमेचा अपहार झाल्याने नळदुर्ग पोलिस ठाण्यात मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या फिर्यादीवरून शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...