Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 2 crores jewelery on Sai idol of Shraddi Laxmipujan

लक्ष्मीपूजनाला शिर्डीतील साईंच्या मूर्तीवर 2 कोटींचे दागिने

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 08:21 AM IST

देश-विदेशातील लाखो भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेत दीपोत्सवही उत्साहात साजरा केला.

 • 2 crores jewelery on Sai idol of Shraddi Laxmipujan

  शिर्डी - साईबाबांच्या ऐश्वर्यसंपन्न धनलक्ष्मीचे लक्ष्मीपूजन बुधवारी पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. या वेळी साईबाबांच्या मूर्तीवर दोन कोटींची आभूषणे घालण्यात आली.यात हिरेजडित रत्नमुकुटाचाही समावेश होता. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता-अग्रवाल यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीपूजन झाले. धूपारतीनंतर दर्शन सुरू झाले. या वेळी देश-विदेशातील लाखो भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेत दीपोत्सवही उत्साहात साजरा केला.

  दिवाळीला चारही दिवस पहाटे सुगंधी उटणे लावून समाधीस व मूर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. लाडू, चकली, चिवडा, करंजी असा फराळाचा नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच नवीन वस्त्रे परिधान करून साईबाबांना अलंकार चढवण्यात आले. सायंकाळी समाधी चौथरा चौरंग, कर्दळीचे खांब बांधून सुशोभित करण्यात आला. समाधी मंदिराच्या तळघरातील लॉकरचे पूजन करण्यात आले.


  मंदिर परिसरात दीपोत्सव : जगभरातील हजारो भक्त साईबाबांच्या सान्निध्यात दीपावली साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल झाले होते. लेंडीबागेत मोठ्या प्रमाणावर तेलाच्या पणत्या लावून त्यांनी दीपोत्सव साजरा केला. स्थानिक साईभक्तांनीही यात मोठा सहभाग घेतला. देशाच्या विविध भागांतील तृतीयपंथीयांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती. संस्थानने मंदिर परिसराची सजावट केली होती. रोषणाईने मंदिर झळाळून गेले होते. मंदिरातील फुलांची सजावट लक्ष वेधून घेत होती. मंदिरातील आकाशकंदील व साईंना चढवलेले अलंकार आणि समाधीवरील सुवर्णजडित शाल भक्तांचे आकर्षण ठरत होते.


  लक्ष्मीपूजनाला ९७ वर्षांची परंपरा : मंदिरातील लक्ष्मीपूजनाला ९७ वर्षांची परंपरा अाहे. १८९२ मध्ये संस्थानची निर्मिती झाल्यानंतर लक्ष्मीपूजनास सुरुवात झाली. आजतागायत ही परंपरा सुरू आहे. प्रारंभी संस्थान आर्थिक अडचणीत होते. गेल्या ९९ वर्षांत शिर्डीचे हे देवस्थान भाविकांच्या संख्येचा विचार केला तर देशात प्रथम क्रमांकाचे तर दानात क्रमांक दोनचे देवस्थान ठरले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात साईंची सुमारे ८५०० मंदिरे आहेत.

  साईबाबांची संपत्ती
  डिपॉझिट : 2029 कोटी
  सोने : 425 किलो
  चांदी : 5000 किलो
  हिरे : 12 कोटी

Trending