आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यान विभागात घाेटाळा; परस्पर केली २५ लाख वृक्षांची माेजणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नानाविध घाेटाळ्यामुळे वादात असलेल्या उद्यान विभागात २५ लाख वृक्षगणनेच्या उद्दिष्टात परस्पर वाढ करून किंबहुना महासभा, स्थायी समितीला डावलून अतिरिक्त सुमारे २३ लाख वृक्षांची माेजणी ठेकेदारामार्फत करून घेण्याचा धक्कादायक प्रकार घडला अाहे. अाधीच्या माेजणीसाठी दाेन काेटी १३ लाख रुपये अदा केल्यानंतर अतिरिक्त २३ लाख वृक्षमाेजणीसाठी साधारण दाेन काेटी रुपये अदा करताना ६५ लाखांसाठी तरतूद काेठून करायची असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाबाबत संशय व्यक्त झाला. त्यानंतर अायुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालून याप्रकरणाची सखाेल चाैकशी करताना गणना झालेल्या वृक्षांची व्यवहार्यता पडताळण्याचे अादेश उद्यान विभागाला दिले अाहेत. 


'हरित नाशिक, संुदर नाशिक'च्या नावाखाली दरवर्षीच वृक्षलागवडीपासून तर अन्य खर्चाबाबत गंभीर अाराेप झाले. वृक्षलागवडीचे कंत्राट घेतल्यानंतर प्रत्यक्षात जागेवर त्याची पडताळणी हाेत नसल्यासारखेही अाराेप झाले. मागील स्थायी समिती सभेत तर, महापालिकेने चक्क ठेकेदाराला काम दिले असताना वृक्षलागवडीसाठी स्वत:च खड्डे खाेदल्याचेही समाेर अाले हाेते. अशातच अाता उद्यान विभागाला समूळ हादरवणारा एका गंभीर प्रकार प्रकाशात येण्याची शक्यता अाहे. महासभा, स्थायी समितीला न विचारताच किंबहुना अायुक्तांनाही अंधारात ठेवून परस्पर २४ लाख वृक्षांची अतिरिक्त माेजणी केल्याचा संशय अाहे. २५ लाख वृक्षगणनेचे उद्दिष्ट असताना चक्क संबंधित माेजणी करणाऱ्या ठेकेदाराला ४९ लाख वृक्ष असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर उद्यान विभागाच्या माजी अधीक्षकांनी तत्कालीन अायुक्तांची मंजुरी न घेताच अतिरिक्त कामासाठी हाेकार दिला. त्यानंतर तब्बल ४८ लाख वृक्षांची माेजणीही पूर्ण झाल्यानंतर जेव्हा संबंधित ठेकेदाराचे उर्वरित देयक देण्याचा विषय अाल्यानंतर प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला. वास्तविक, चालू वर्षाच्या अायुक्तांच्याच अंदाजपत्रकात अतिरिक्त कामासाठी एक काेटी ३५ लाखांची तरतूदही करण्यात अाली. मात्र, २५ लाखाचे उद्दिष्ट असताना फार तर त्यात ५ वा १० लाखांची भर पडून ३५ लाखांपर्यंत वृक्ष पाेहाेचतील असा अंदाज हाेता. मात्र, या अंदाजाला तडा जात जेव्हा प्रकरण थेट ४९ लाखांवर पाेहाेचल्यानंतर मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, उद्यान विभागाला संबंधित सर्वेक्षणातील व्यवहार्यता तपासणीचे अादेश दिल्याचे समजते. त्यामुळे उद्यान विभागाची धावपळ सुरू झाल्याचे समजते. 


असे झाले काेटीच्या काेटी उड्डाण 
२१ नाेव्हेंबर २०१६ राेजी टेरेकाॅन इकाेटेक प्रा. लि., मुंबई यांना वृक्षगणनेचे काम देण्यात अाले. उद्यान विभागाने शहरात साधारण २५ लाख वृक्ष असतील असा अंदाज धरून सर्वेक्षण सुरू केले. त्यासाठी ८ रुपये ५० पैसे प्रतिवृक्ष याप्रमाणे दाेन काेटी १३ लाख ७५ हजार रुपये अदा करणे अपेक्षित हाेते. त्याप्रमाणे निविदाही अंतिम झाली. या कामाची मुदत २० डिसेंबर २०१७ पर्यंत हाेती. मात्र त्यानंतर तब्बल अाठ महिन्यांपासून वृक्षगणनेचे काम सुरूच असून त्याचे प्रमुख कारण म्हणजे, शहरात ४९ लाखांपर्यंत वृक्ष असण्याचा अंदाज ठेकेदाराने वर्तवला व उद्यान विभागाने पडत्या फळाची अाज्ञा म्हणून त्यास माेजणीचे अतिरिक्त कामही दिले. त्यानंतर अतिरिक्त २३ लाख वृक्षगणनाही पूर्ण झाली असून, लष्करी हद्द व पाेलिस प्रशिक्षण अकादमी येथे परवानगीची अडचण असल्यामुळे उर्वरित एक लाख वृक्षगणना हाेऊ शकली नसल्याचा अंदाज अाहे. 


४७ टक्के गिरीपुष्प; एका व्यक्तीमागे तीन झाडे 
४८ लाख वृक्षांची माेजणी जवळपास पूर्ण झाली असून त्यात ४७ टक्के गिरीपुष्प हे वृक्ष अाढळल्यामुळे उद्यान विभागालाही चांगलाच धक्का बसला अाहे. हे वृक्ष अचानक कसे वाढले याचा शाेध सुरू झाला असून अाता ठेकेदाराकडून सहाही विभागनिहाय तसेच विशिष्ट प्रभागात काेठे व किती वृक्ष अाढळले याची माहिती मागवली अाहे. या माहितीची उद्यान निरीक्षकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करावी लागणार अाहे. 


बी. यू. माेरे यांची अडचण वाढणार 
महापालिकेचे तत्कालीन उद्यान अधीक्षक बी. यू. माेरे यांच्या कार्यकाळात ही अतिरिक्त वृक्षमाेजणीची प्रक्रिया झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असून त्यामुळे त्यांची अडचण वाढणार अाहे. माेरे यांनी अतिरिक्त माेजणीसाठी तत्कालीन अायुक्त अभिषेक कृष्णा यांची परवानगी घेतली हाेती का? असाही प्रश्न अाहे. काही दिवसापूर्वीच विधी विभागाशी संबंधित न्यायालयीन खटले हरण्यामागे पालिकेचा कारभार जबाबदार असल्याचा अाराेप खुद्द पॅनलवरील वकीलांनी केल्यानंतर तत्कालीन विधी विभाग प्रमुख म्हणून माेरे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले हाेते. माेरे हे स्वेच्छानिवृत्तीने काही महिन्यांपूर्वीच महापालिकेतून बाहेर पडले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...