आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केज - पाझर तलावातील गाळ टिप्परने शेतात आणून टाकीत असताना गाळाच्या ढिगाऱ्याजवळ रात्रीच्या वेळी झोपलेल्या काका, पुतण्याच्या अंगावरून टिप्पर गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील भाटुंबा येथे गुरुवारी पहाटे अडीच वाजता घडली. सर्जेराव बब्रुवान धपाटे ( वय ४५ ), परमेश्वर हरिदास धपाटे ( वय २५ ) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्जेराव धपाटे यांच्या आजारी आत्याला या घटनेची माहिती मिळताच धक्का बसून त्यांनीही रुग्णालयात प्राण सोडले.
भाटुंबा येथील शेतकरी सर्जेराव बब्रुवान धपाटे यांना दोन एकर शेती अाहे. पुतण्या परमेश्वर हरिदास धपाटे यांना दीड एकर माळरानाची जमीन आहे. त्यांच्या शिवाराशेजारील जवळबनच्या पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरू अाहे. शेतकरी तलावातील गाळ काढून शेतात टाकत आहेत. हा गाळ टाकण्यासाठी बारामतीहून टिप्पर मागवण्यात आल्याने धपाटे काका व पुतण्याने तलावातील गाळ टिप्परने आणून शेतात टाकण्याचे ठरवले होते. बुधवारी रात्री टिप्परने गाळ आणून शेतात टाकला जात होता. दोघेही टिप्परच्या खेपा मोजण्यासाठी शेतात थांबले होते. तलावावरून गाळ भरून येण्यासाठी टिप्परला किमान एक तास लागत होता.
बुधवारी रात्री दीड वाजल्यावर दोघांना झोप आवरली नाही, म्हणून दोघे गाळाच्या ढिगाऱ्याजवळ झोपले. पहाटे २.३० वाजता टिप्पर ( क्रमांक एम. एच. ४२ टी ०८७० ) गाळ घेऊन शेतात आल्यानंतरही दोघांना जाग आली नाही . शेतात गाळ टाकण्यासाठी आलेल्या टिप्पर चालकाने टिप्पर मागे घेत असताना त्याला टिप्परच्या मागे दोघे काका -पुतणे झोपल्याचे दिसले नाही. टिप्पर दोघांच्या डोक्यावरून व अंगावरून गेल्याने दोघे जागीच ठार झाले. काही वेळातच टिप्परचा चालक गाळ मिश्रित माती खाली टाकण्यासाठी टिप्परचा फलका काढण्यासाठी टिप्परच्या पाठीमागे गेला. तेव्हा त्याला हे दोघे टिप्परच्या चाकाखाली चिरडून ठार झाल्याचे दिसून आले.
मृतदेहावर माती टाकून चालक पसार
आपल्या चुकीने दोघांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर टिप्पर चालकाने तशीच माती मृतदेहावर टाकून झालेल्या घटनेची माहिती टिप्पर मालकाला सांगून पसार झाला. घटनेची माहिती गुरुवारी पहाटे गावात मिळाल्यानंतर ग्रामस्थ, युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आंनद झोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी व खोऱ्याच्या मदतीने मातीचा ढिगारा बाजूला सारून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून सकाळी ११.३० वाजता दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भाटुंबा गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आंनद झोटे हे पुढील तपास करीत आहेत.
परमेश्वर एकुलता एक
परमेश्वर हरिदास धपाटे हा तरुण बारावीचे शिक्षण घेऊन आईवडिलांना शेतीत मदत करीत होता. त्याच्या मोठ्या भावाचे एक वर्षापूर्वी आजाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात परमेश्वर हा एकुलता एक मुलगा होता. परमेश्वरच्या अकाली मृत्यूने त्याच्या आईवडिलांचा आधारही गेला. तर सर्जेराव धपाटे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
धक्क्याने धपाटेच्या आत्याचे निधन
शेतात तलावातील गाळ टाकत असताना टिप्परखाली चिरडून भाटुंबा येथील सर्जेराव धपाटे व त्यांचा पुतण्या परमेश्वर धपाटे यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गुरुवारी सकाळी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याच रुग्णालयात मयत सर्जेराव धपाटे यांची आत्या भागूबाई रामदास इंगळे ( वय, ६५ रा. आणेगाव ता. केज ) या आजारी असल्याने उपचारासाठी होत्या. त्यांना ही दुःखद घटना समजल्यावर त्यांना धक्का बसल्याने त्यांनीही प्राण सोडले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.