आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी बाइक घेताना डिलरला 2 हेल्मेट देणे बंधनकारक; पण सर्रास हेल्मेट न देता ग्राहकांना गाड्यांची विक्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दुचाकीची विक्री करताना अधिकृत विक्रेत्याने दोन हेल्मेट ग्राहकांना देणे बंधनकारक असताना विक्रेत्यांकडून मात्र या नियमाला तिलांजली दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातच हेल्मेटसाठी रक्कम आकारली जात असून हेल्मेट नको असल्यास तसे घोषणा पत्रही लिहून घेतले जात असल्याचे प्रकार विक्रेत्यांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. 
दुचाकी अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यातील बहुतांश मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने होत असल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे.

 

त्यामुळे परिवहन विभागाने दोन वर्षांपूर्वी दुचाकी विक्रेत्यांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. परंतु जिल्ह्यात बहुतांश विक्रेते ग्राहकांना हेल्मेट देत नसल्याचे 'आरटीओ' अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. सदर अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने हेल्मेट वापरण्याबाबत विविध शासकीय यंत्रणांकडून दुचाकीचालकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतरही जिल्ह्यात सुमारे ९० टक्क्यांच्यावर दुचाकीस्वार विना हेल्मेट वाहन चालवत असल्याचे चित्र दिसून येते. दोन वर्षांपूर्वी परिवहन विभागाने एक परिपत्रक काढून डिलरने दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. मात्र सद्या अमरावती जिल्ह्यात बहुतांश वाहन विक्रेत्याकडून नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हेल्मेट दिले जात नाही.

 

या प्रकरणात काही डिलरने नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हेल्मेटची किंमत अतिरिक्त आकारणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ग्राहकांनी हेल्मेट घेण्यास नकार दिला. अशा वेळी नकार देणाऱ्या ग्राहकांकडून, आमच्याकडे पूर्वीच हेल्मेट आहे, आम्हाला हेल्मेट नको, अशा आशयाचे घोषणापत्र डीलर ग्राहकाकडून घेतात, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनीच दिली आहे. दरम्यान वितरकांना हेल्मेट देणे बंधनकारक करावे, यासाठी जिल्ह्यातील सर्वच वितरकांना नव्याने स्मरणपत्र देण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


त्याचप्रमाणे नवीन चारचाकी वाहन घेताना वाहनाच्या मूळ किमती व्यतिरिक्त पुढील आणि मागील गार्डसाठी बहुतांश ग्राहकांकडून हजारो रुपये खर्च केले जातात. परंतु न्यायालयाने ७ डिसेंबर २०१७ रोजी वाहनांवरील पुढील आणि मागील गार्डवर लावण्यावर बंदी घातली आहे. गार्ड लावलेल्या वाहनाला अपघात झाल्यास वाहनांचे गार्ड पादचाऱ्यांसाठी अधिक धोकादायक ठरते. जिल्ह्याच्या विचार करता सुमो, लहान प्रवाशी वाहन, काही एसयूव्ही वाहनांना सर्रास असे गार्ड लावण्यात आले आहे. मात्र या गार्डवरील वाहनांवर आरटीओकडून कारवाई झालेली नाही.

 

त्यामुळे आता तत्काळ प्रभावाने अशा वाहनांवर कारवाई होणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोडे आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी 'दै. दिव्य मराठी' सोबत बोलताना सांगितले आहे. 


चारचाकी वाहनांना गार्ड लावल्यास कारवाई, नियमांची पायमल्ली 
मागील वर्षांच्या तुलनेत अपघात घटले मात्र मृत्युसंख्या वाढली 
वर्ष अपघात शहर ग्रामीण एकूण अपघात मृत्यू 
२०१७ ४७१ ७२९ १२०० २७९ 
२०१८ ४५३ ६४४ १०९७ २९८ 


नवीन दुचाकीसोबत हेल्मेट देणे बंधनकारक 
डिलरने ग्राहकाला दुचाकी विक्री केल्यानंतर दुचाकीसोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी निर्णय झाला. आम्ही आता सर्व डिलरला दुचाकी विक्रीसोबत हेल्मेट बंधनकारक असल्याबाबत स्मरणपत्र देऊन ती बाब अमलात आणण्याबाबत सूचना देणार आहे. तसेच ज्या चारचाकी वाहनांवर गार्ड असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.

-विजय काठोडे, उप प्रादे.परिवहन अधिकारी. 

 

हेल्मेट सुरक्षेसाठी आवश्यक 
वाहनांची वाढलेली संख्या व त्यासोबतच वाढलेले अपघात लक्षात घेता दुचाकी चालकांनी विना हेल्मेट दुचाकी चालवून नये. हेल्मेट सक्ती नाही, याचा अर्थ हेल्मेट घालायला नको, हे चुकीचे आहे. हेल्मेट ही सक्ती नसून ती सुरक्षा आहे, हे प्रत्येक दुचाकीस्वाराने समजून घेत हेल्मेटचा स्वीकार करून वापर करण्याची गरज असल्याचे आरटीओ अधिकारी, कर्मचारी रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थी, रस्त्यावंरील वाहनचालक तसेच दुचाकीस्वारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...