आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 News Showing Pak's Unclean Intentions, Army Mobilization In Poke, 2 Pak Soldiers Killed, Pak Claims Same

पाकचे नापाक इरादे दर्शवणाऱ्या 2 बातम्या, पीओकेत लष्कराची जमवाजमव, 2 पाक सैनिकांचा खात्मा, पाकचाही असाच दावा

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुजफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) : पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर गोठवून टाकणाऱ्या थंडीत अचानक सैनिकांच्या वेगवान हालचालींमुळे तापले आहे. नीलम खोऱ्यात भारत-पाकदरम्यान सुरू असलेल्या चकमकींमुळे पाकिस्तानी लष्कराच्या या असामान्य हालचाली दिसून येत आहेत. गेल्या १० दिवसांत लष्करी वाहनांचे लांबचलांब काफिले मोठ्या तोफांसह व्याप्त काश्मीर भागात नियंत्रण रेषेलगत (एलओसी) दाखल होत आहेत. १९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर प्रथमच असे वातावरण दिसून येत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या राखीव तुकड्याही एलओसीजवळ छावण्या उभारून तयारी करत आहेत. नीलम खोरे आणि देवा सेक्टरमध्ये लष्कराच्या हालचाली अधिक वाढल्या आहेत. नीलम खोऱ्यात अशात पाकिस्तानी सैनिकांनी सातत्याने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. दैनिक भास्करला तेथील एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, लष्कराचे मोठे ट्रक प्रचंड शस्त्रसाठा घेऊन या भागात दाखल होत आहेत. हे ट्रक प्लास्टिकच्या ताडपत्र्यांनी झाकलेले आहेत. वास्तविक, भारत व्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करू शकतो, ही भीती पाकला आहे. याला पाकिस्तानी लष्करातील एका अधिकाऱ्यानेही पुष्टी दिली.

लष्कराचा विषय त्यांनाच माहीत : मंत्र्याने हात झटकले

दै. भास्करने पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींबद्दल पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एलओसीवरील हालचालींबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. मात्र म्हणाले, हा लष्कराचा विषय आहे. त्यांनाच याबद्दल माहिती आहे. वाढत्या तणावात आमचे लष्कर तयारी करत असेल. यावर जास्त बोलणार नाही.

३४ हजार लोकांनी नियंत्रण रेषेवरच राहावे; महिलांना 10 डॉलर/महिना

इस्लामाबाद : पाक एकीकडे लष्कराची जमवाजमव करत आहे, तर दुसरीकडे भारतीय हल्ल्यांपासून वाचण्यासाठी नियंत्रण रेषेवरील नागरिकांची ढाल करत आहे. पाक सैन्याप्रति लोकांत वाढत असलेला अविश्वास लक्षात घेऊन पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी नियंत्रण रेषेवरील लोकांना वस्ती न सोडण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. नियंत्रण रेषेनजीकच्या दोन किमी कक्षेत वास्तव्यास असलेल्या ३३,४९८ कुटुंबांतील सर्व विवाहित महिलांना दर महिन्याला १० डॉलर (१५४६ पाकिस्तानी रुपये)मिळतील. अट एकच, या कुटुंबांनी सीमा सोडायची नाही. सीमा सोडल्यास आर्थिक मदत परत घेतली जाईल.

पाकिस्तानचे काश्मिरी मानवाधिकार कार्यकर्ता फिदा हुसेन सय्यद यांनी सांगितले की, १० डॉलरची सरकारी योजना लोकांची क्रूर चेष्टा आहे. सय्यद म्हणाले- गोळीबार कोणत्याही बाजूने झाला तरी नुकसान या लोकांचे होते. बळी जाताहेत, घरे उद्ध्वस्त होताहेत. येथे खूप गरिबी आहे, त्यामुळे पैशाच्या आशेने लोक येथे थांबतील. दुसरीकडे मुजफ्फराबादेत तैनात प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मान्य केले की, नियंत्रण रेषेवरील पाक सैन्याच्या हालचालींमुळे लोकांत नाराजी वाढली आहे.

पलायन थांबले तर पाक सैन्याचे मनोधैर्य वाढेल

नियंत्रण रेषेवर राहणारे ग्रामस्थ आसिफ बट यांनी सांगितले की, तणाव पाहता त्यांनी कुटूंब मुझफ्फराबादला हलवले आहे. सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले ती, लोकांना सीमेवरच थांबवण्याचे पाकला दोन फायदे होतील. पहिला : भारताला या लोकांवर हल्ले करण्यात अडचणी येतील. दुसरा : नागरिक मृत्यूमुखी पडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू लंगडी होईल.

श्रीनगर/ रावळपिंडी : भारतीय लष्कराने पाकने केलेल्या युद्धबंदीला चोख प्रत्युत्तर दिले. यात नायब सुभेदार कंदेरा आणि शपाई अहसान हे दोन सैनिक मारले गेले. दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दावा केला आहे की, पाक लष्कराने हाजी पीर सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर हल्ले केले.