आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुमुद दास
मुंबई - व्हॉट्सअॅपवर २००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याच्या अफवा पसरत आहेत. संदेशात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँक २००० च्या नोटा परत घेत आहेत, तुम्ही ५० हजारांच्या नोटा बदलू शकता. हा खोटा संदेश होता, मात्र वास्तवात देशभरात अचानक २००० रुपयाच्या नोटांची कमतरता झाली आहे. सामान्य माणसाच्या मनात २००० रुपयांच्या नोटांबाबत अनेक शंका आहेत. यामुळे 'भास्कर'ने शोध घेतला की, २००० रुपयांच्या नोटा अखेर गेल्या कोठे? यात समजले की सन २०१६-१७च्या तुलनेत सन २०१८-१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या मागणीत ९८.६ टक्के घट झाली आहे. विविध बँका ग्राहकांच्या मागणीनुसार आरबीआयकडून नोटांची मागणी करतात. आरबीआयच्या आकड्यांनुसार २०१६-१७ च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये दोन हजारच्या बनावट नोटांच्या संख्येत ३३०० टक्के वाढ झाली. या आधी आर्थिक विश्लेषण आणि धोरण विभागाने दोन हजाराची नोट बंद करण्याची शिफारस केली होती. आता त्याची छपाई कमी केली जात आहे. यामुळे विविध बँकांच्या एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा कमी मिळत आहेत. यामुळे एटीएम आता लवकर खाली होत आहेत. एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या एटीएममध्ये आधी सुमारे ८ लाख रुपये एकावेळी भरले जायचे. मात्र, आता लहान नोटांमुळे ६ लाखच भरले जात आहेत.
भास्करला अर्थमंत्र्यांनी सांगितले- बंद होणार नाहीत दोन हजाराच्या नोटा
> प्रश्न : दोन हजारच्या नोटा बंद होत आहेत का?
- 'भास्कर'शी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ला नोटा कमी छापण्याचे आदेश दिलेले नाहीत. तसेच, त्यांनी स्पष्ट केले की, सध्या सरकार २००० च्या नोटा चलनातून बाहेर करण्याच्या तयारीत नाही. तसेच, त्या ऐवजी नवीन नोटाही आणणारही नाही.
> प्रश्न : तर, मग बाजारातून नोटा गायब कशा?
- भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (बीआरबीएनएमपीएल)च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आता २००० रुपयांच्या नोटा छापणे कमी करण्यात आले आहे. यामुळे बाजारात २००० रुपयांच्या नोटांची कमतरता आहे. बँका आणि लोकांकडूनही त्यांची मागणी घटली आहे.
> प्रश्न : ग्राहकांना यामुळे अडचणी आहेत का?
- २००० रु.ची नोट मिळत नसल्याने एटीएम लवकर खाली होत आहेत. अनेकदा ग्राहकांना दुसऱ्या एटीएमवर जावे लागत आहे. ज्यांना रोकड हवी आहे त्यांना मोठी नोट मिळत नाही.
> प्रश्न : अडचण येऊ नये यासाठी बँका काय करत आहेत?
- स्टेट बँक आॅफ इंडियाचे एमडी पी. के. गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही आमच्या एटीएमला रिकॅलिब्रेट करून कॅसेट्स बदलत आहोत. यामुळे २०००च्या ऐवजी दुसऱ्या नोटांची मागणी पूर्ण करता येईल. बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक ए. के. दास यांनी सांगितले की, आमच्या देशात ६ हजार एटीएम आहेत. यातून रोज १०-१२ लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन होते. आतापर्यंत आम्ही अनेक प्रकारच्या नोटा देत होतो. मात्र, मागील काही दिवसांपासून आम्हाला अॅपेक्स बँकेकडून २००० च्या नोटा मिळत नाहीत. यामुळे लहान मूल्याच्या नोटांवर काम धकवले जात आहे. सण किंवा लग्नासाठी एखाद्याला २ हजारांची नोट हवी असेल तर तो ती बँकेतून घेऊ शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.