आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमधील 3 आमदार आणि 50 नगरसेवकांनी घेतला भाजपमध्ये प्रवेश, तृणमूलचे 2 तर सीपीएमचा 1 आमदाराचा समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या 18 जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक राजकारणात शिरकाव केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाचे दोन आमदार आणि 50 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत या नेत्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. 2017 मध्ये तृणमूलमधून भाजपात सहभागी झालेले मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार शुभ्रांशू रॉयसह तीन आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये एका सीपीएमच्या आमदाराचाही समावेश आहे. बीजपूरचे आमदार शुभ्रांशू रॉय, आमदार तुषार कांती भट्टाचार्य आणि सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.


या प्रवेशानंतर भाजप आणि तृणमूलमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही पक्षांमध्ये हिंसाचारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण ममता बॅनर्जींच्या आक्रमकतेला फोडाफोडीने उत्तर देण्याचा प्लॅन भाजपने केल्याचे दिसत आहे. लोकसभेपूर्वी तृणमूलचे सात ते आठ खासदार भाजपात आले होते.


बंगालमधील काचरापारा महापालिकेचे 17 नगरसेवक भाजपात सहभागी झाले, यात महापौर आणि उपमहापौराचाही समावेश आहे. एकूण 26 सदस्य असलेल्या या महापालिकेतील 17 सदस्य भाजपात आल्याने इथे भाजपची सत्ता आली आहे. याशिवाय आणखी दोन महापालिकांवरही भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तीन महापालिकांमधील एकूण 50 नगरसेवक भाजपात सहभागी झाले.


आमदार आणि नगरसेवकांनी भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. तृणमूलला आणखी धक्के देणार असल्याचे ते म्हणाले. हा पहिला टप्पा आहे, ज्या प्रमाणे निवडणुकीत सात टप्पे झाले होते, त्याचप्रमाणे आणखी सात टप्प्यांमध्ये भरती केली जाईल, अशी माहिती विजयवर्गीय यांनी दिली.