आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माळकरी युवकांचे दिवसा कीर्तन, रात्री घरफोड्या, मुलगा बिघडला म्हणून पित्याने संस्कार शिबिरात टाकले, पण चोऱ्या वाढल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुलगा व त्याचा मित्र घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे करू लागले म्हणून वडिलांनी दोघांना आळंदीतील संस्कार शिबिरात टाकले. सुधारण्याऐवजी वर्षभरात केलेल्या चोरीचा स्वत:चाच विक्रम त्यांनी मोडून काढला. वर्षभरात २० घरफोड्या केल्या होत्या. पण दोन महिन्यांत संस्कार शिबिरात गेल्यानंतर दिवसा भजन, कीर्तन, ध्यानधारणा करून रात्री मात्र २० पेक्षा अधिक चोऱ्या केल्याचे उघडकीस आले. मध्यरात्री पोलिसांनी पकडले तरी गळ्यातील माळ, संस्कार शिबिराचे ओळखपत्र दाखवून ते निसटून जात. अखेर आठवडाभर हडपसर पोलिसांनी माग काढत त्यांना अटक केली. 

 

हडपसरमधील रहिवासी सागर दत्तात्रय भालेराव (२१), स्वप्निल नामदेव गिरमे (२४) चांगले मित्र आहेत. माळकरी असलेले स्वप्निलचे वडील एसटी महामंडळात वाहक आहेत. त्यांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण आहे. दोघेही चोरी करत असल्याचे समजल्यावर दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी स्वप्निल व सागरला संस्कार शिबिरात दाखल केले. पण सुधारण्याऐवजी दोघेही जास्तच बिघडले. वर्षभरात त्यांनी ४० वर गुन्हे केले आहेत. पोलिसांनी १३१ ग्रॅम साेन्याचे दागिने, पाच दुचाकी, दहा मोबाइल, दाेन एलसीडी टीव्ही, एक कॅमेरा, २६ हजार राेख असा एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे.
 
सागरला आईचीही साथ? 
सागर व स्वप्निल मांजरी परिसरातील रहिवासी असल्याने गेल्या ४ वर्षांपासून मित्र होते. सागर दहावी नापास आहे, तर स्वप्निलने अकरावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. सागरच्या वडिलांचे निधन झाले असून आई घरकाम करते. मोठा भाऊ खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. आठवडाभरातील चोरीचा मुद्देमाल दोघेही भाजीपाला घेण्याच्या निमित्ताने शिबिराबाहेर पडून सागरच्या आईला नेऊन द्यायचे. त्यामुळे त्याच्या आईचीही चौकशी केली जाणार आहे. 

 

चोरीच्या दुचाकीने करायचे गुन्हा 
याआधीही दोघांना घरफोडी प्रकरणात अटक झाली होती. पण संस्कार शिबिरात दररोज सकाळ-संध्याकाळ ६ तास भजन, कीर्तन करून रात्री उशिरा ते दुचाकीवर चोरीसाठी निघायचे. दुचाकी निर्जनस्थळी लावून दुसरी दुचाकी चोरायचे आणि चोऱ्या करायचे. घरफोडीनंतर ही दुचाकी रस्त्यावर सोडून करिझ्मावर शिबिरात येऊन आराम करायचे, असा नित्यक्रम ठरला होता. 

बातम्या आणखी आहेत...