आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्तीच्या काळात राज्यातल्या मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून घरबसल्या अभ्यास देण्याचे प्रयत्न विविध पातळ्यांवरून होत आहेत. प्रत्यक्षात राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या ३७ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असून यातील अवघ्या २० टक्के मुलांच्या पालकांच्या स्मार्टफोनला इंटरनेट सुविधा असल्याचे वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जिल्हा परिषदसह विविध व्यवस्थापनांच्या एकूण ११८६ शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून एक लाख ६७ हजार ६८७ मुलांविषयीची माहिती अभ्यासण्यात आली. यापैकी ४५ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असले तरी केवळ २७ टक्के पालकांकडे इंटरनेटची जोडणी आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधा नसलेल्या ‘ऑफलाइन’ मुलांच्या अभ्यासाचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘अॅक्टिव्ह टीचर्स फोरम’(एटीएफ) या शिक्षक गटाने केलेले ‘डिजिटल अॅक्सेस’ हे राज्यस्तरीय सर्वेक्षण कोरोना संकटकाळात बालकांच्या शिक्षण हक्काचा विचार ‘डिजिटलेतर पद्धतीने’ करावा लागेल, असे सुचवते.
शालेय मुलांपैकी राज्यातली किती मुले खरोखरीच ‘ऑनलाइन’ अभ्यास करू शकण्याची शक्यता आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच सर्वांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळावी, जूननंतर शाळाबंदी लांबल्यास शिक्षणाचा विचार करण्याचे निराळे पर्याय समोर यावेत या उद्देशाने ‘एटीएफ’ने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जिल्हा परिषदांच्या शाळांमधल्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे दिसते. नाशिकच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना सर्वेक्षणात सहभागाचे विशेष आवाहन केले होते. राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या १०५४ शाळांमधल्या ९७ हजार ७९४ मुलांपैकी ५२ हजार ५५८ मुलांच्या घरी टीव्ही संच, तर ३ हजार ४६९ मुलांकडे लॅपटॉप किंवा संगणक आहेत. ६८ हजार ५० साधे फोन, तर ३६ हजार ३०० स्मार्टफोन आहेत. २ हजार १०८ मुलांकडे स्वत:चे फोन आहेत. ३६ हजार ३०० स्मार्टफोन असले तरी २० हजार ४२२ पालकांकडे २०.८८ टक्के स्मार्टफोनला इंटरनेटची जोडणी आहे. नगरपालिका, महानगरपालिकांच्या शाळांत शिकणाऱ्या शहरी भागातल्या पालकांची बिकट आर्थिक परिस्थिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या शाळांमधील ४ हजार २८० पैकी एक हजार ३७६ पालकांकडे स्मार्टफोन असले तरी ६११ म्हणजे केवळ १४ टक्के स्मार्टफोनला इंटरनेटची जोडणी आहे. खासगी अनुदानित शाळांतील ४३ हजार ३१२ मुलांपैकी २२ हजार ८६० पालकांकडे स्मार्टफोन असून ३५ टक्के स्मार्टफोनला इंटरनेटची जोडणी आहे.
स्मार्टफोनची संख्या वाढण्याची शक्यता कमी
सर्व अास्थापनांच्या एकूण ११८६ शाळांमधल्या १ लाख ६७ हजार ६८७ मुलांविषयीची माहिती समाविष्ट असून मुलांच्या एकूण संख्येपैकी ४५ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असले तरी केवळ २७ टक्के पालकांकडे इंटरनेटची जोडणी आहे. मात्र ६३ टक्के मुलांच्या घरी टीव्ही आहेत. स्मार्टफोनधारक सर्व पालक मुलांच्या हातात फोन देतात असे गृहीत धरले तरी स्मार्टफोनवर दिल्या जाणाऱ्या टेस्ट आणि जुजबी अभ्यास वगळता या माध्यमाच्या मदतीने शिक्षणाला अनेक मर्यादा दिसतात. सध्याच्या काळात ग्रामीण पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता स्मार्टफोनची संख्या वाढायची शक्यता कमी दिसते. भविष्यात लॉकडाऊनचा काळ वाढत गेल्यास स्मार्टफोनऐवजी टीव्ही किंवा रेडिओ हे शिक्षणाचे चांगले माध्यम असू शकेल. कोरोना आणि कोरोनात्तर काळात शिक्षणाचा आणि अभ्यासाचा नव्याने विचार करायची संधी यानिमित्ताने मिळाली असून अलीकडेच तयार करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या ‘थिंक टंक’सहित विविध तज्ञांनी, शिक्षकांनी एकत्र येऊन नवा विचार करण्याचे आवाहन एटीएफतर्फे संयोजक भाऊसाहेब चासकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.