आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबाद पाणीपुरवठा योजनेत फुलंब्रीसह २० गावांचा समावेश; उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे. खुलताबादसह आठ गावांसाठी तातडीची पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. मात्र, आता फुलंब्रीसह इतर २० गावे घेण्याबाबत बदल सुचवण्यात आला आहे. त्यामुळे आठवडाभरात हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठवला जाणार असल्याची माहिती मजिप्रचे कार्यकारी अभियंता पी. डी. भामरे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली आहे. 

 

खुलताबाद शहर आणि जवळपासच्या आठ गावांचा पाणी प्रश्न बिकट झाला त्यामुळे एम. जी. पी.च्या माध्यमातून सुमाररे ६ कोटी ३५ लाख रुपयांची तातडीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये आणखी २० गावांचा समावेश करण्यात येणार आहे. 
त्यामुळे या प्रस्तावात दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच पाइपलाइनच्या व्यासात वाढ करावा लागणार आहे. गंधेश्वर प्रकल्पातून येसगाव प्रकल्पात अशा २२ किमीच्या पाइपलाइनमधून कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे. 

 

आठवडाभरात प्रस्ताव होणार सादर खुलताबादसह बाजारसावंगी, कानडगाव, सुलतानपूर भांडेगाव, गदाना, बुरवाडी, वाडोदपूर, माटरगाव या गावांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. येसगाव प्रकल्पात पाणी नसल्यामुळे खुलताबादला पाणी मिळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठवला आहे. या गावांवर दरवर्षी दोन कोटी रुपये टँकरवर खर्च होतात. त्यामुळे हा खर्चदेखील वाचणार असल्याचे भामरे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 

 

७० हजार लोकांना मिळणार फायदा 
या योजनेमुळे खुलताबादसह ३५ हजार लोकांना पाण्याची चिंता मिटणार आहे, तर फुलंब्रीसह २० गावच्या ३५ हजार लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे साधारण ७० हजार लोकांची चिंता मिटणार आहे. गंधेश्वर प्रकल्पाची क्षमता ३.८० दलघमी इतकी असून दहा वर्षांपैकी ९ वर्षे हा प्रकल्प भरतो. यावर्षीही धरणात पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे या प्रकल्पातून पाणी साठा उपलब्ध होणार आहे. या गावांची संख्या वाढल्यामुळे साधारण दहा कोटी रुपयांपर्यंत हा खर्च येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

बातम्या आणखी आहेत...