MP bungalow / २०० माजी खासदारांचा अजूनही सरकारी बंगल्यांतच ठिय्या

महिनाभरात निवासस्थान रिक्त करण्याचा नियम, प्रथमच निवडून आलेल्या खासदारांची इतरत्र व्यवस्था

दिव्य मराठी

Aug 19,2019 09:22:00 AM IST

नवी दिल्ली - १६ वी लोकसभा विसर्जित होऊन दोन महिने उलटून गेले तरी २०० पेक्षा जास्त माजी खासदारांनी अजूनही ल्युटिअन्स दिल्लीतील त्यांना दिलेली शासकीय निवासस्थाने रिकामी केलेली नाहीत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नियमांनुसार, लोकसभा विसर्जित झाल्यानंतर एक महिन्याच्या आत माजी खासदारांना आपापले सरकारी निवासस्थान रिक्त करावे लागते.


केंद्रात मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंंतर मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या २५ मे रोजी १६ वी लोकसभा विसर्जित केली होती. सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, १६ व्या लोकसभेतील सदस्यांना २०१४ मध्ये शासकीय निवासस्थाने देण्यात आली होती, मात्र अद्यापही २०० माजी लोकसभा खासदारांनी त्यांना दिलेली निवासस्थाने रिकामी केलेली नाहीत. त्यामुळे १७ व्या लोकसभेत प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना तात्पुरती निवासस्थाने देण्यात आली आहेत. त्यांना खासदारांना ल्युटिअन्स दिल्लीत पूर्णकालीन निवासस्थाने मिळत नाहीत तोपर्यंत त्यांची वेस्टर्न कोर्ट आणि इतर विश्रामगृहांत तात्पुरती सोय करण्यात आली आहे. खासदारांच्या राहण्याचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने ही सोय करण्यात आली आहे. तत्पूर्वी, कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत नवनिर्वाचित खासदार पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत असत.

२६० पेक्षा जास्त खासदार प्रथमच लोकसभेत
१७ व्या लोकसभेत २६० पेक्षा जास्त खासदार प्रथमच लोकसभेत निवडून आले आहेत. त्यात क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणारे गौतम गंभीर, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि स्मृती इराणी, प्रसिद्ध सुफी गायक हंसराज हंस आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मिमी चक्रवर्ती व नुसरत जहाँ रूही यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

X