आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळमनुरी तालुक्यातील दाती शिवारातून 200 जिलेटिन कांड्या, 189 डिटोनेटर जप्त

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
कळमनुरी येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागातील एका घरातून जप्त केलेल्या तलवारी. - Divya Marathi
कळमनुरी येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागातील एका घरातून जप्त केलेल्या तलवारी.

हिंगोली : कळमनुरी तालुक्यात स्थानिक गुुन्हे शाखेच्या पथकाने दाती शिवारातून दोनशे जिलेटिनच्या कांड्या व १८९ डिटोनेटर रविवारी दुपारी जप्त केले आहे. या प्रकरणी पुसद तालुक्यातील एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. या सोबतच कळमनुरी शहरातून अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या तलवारीसह पाच तलवारीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

कळमनुरी तालुक्यातील दाती शिवारात एका विहिरीजवळ जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर असल्याची माहिती गुुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, जमादार महेश बंडे, संभाजी लकुळे, रुपेश धाबे, फुलाजी सावळे, किशोर सावंत, भगवान आडे, किशोर काकडे, विठ्ठल कोळेकर, दीपक पाटील, आकाश टापरे, महिला पोलिस कर्मचारी शेख रेश्‍मा, रवीना घुमनर यांच्या पथकाने दाती शिवारात छापा टाकला. यात एका विहिरीजवळ दोनशे जिलेटिनच्या कांड्या, १८९ डिटोनेटर व काही तोटे असे स्फोटक साहित्य मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी संभाराव रामा भालेराव (रा. पोखरी, ता. पुसद) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडे स्फोटक साहित्य बाळगण्याचा कुठलाही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी साहित्य जप्त केले अाहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात भारतीय स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरीतून पाच तलवारी जप्त

कळमनुरी येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागात एका घरात तलवारी असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून याच पथकाने सुनीलसिंग बावरी याच्या घरावर छापा टाकला. यामध्ये पाच तलवारी जप्त केल्या आहेत. यात एक अर्धा किलो वजनाची चांदीची तलवार आहे. या प्रकरणी जमादार संभाजी लकुळे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात सुनीलसिंग बावरी याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.बातम्या आणखी आहेत...