आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 इंचांच्या सायकलवरून 13 तासांत गाठले 200 किमीचे अंतर; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या ध्येयवेड्या अभिजित बंगाळेने लहान मुलांच्या सायकलवरून थेट विक्रमाला गवसणी घातली. त्याने लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या २० इंची सायकलने २०० किमीचे अंतर चक्क १३ तासांत गाठण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड््समध्ये नोंद करण्यात आली. या लहान सायकलवरून हे अंतर झटपट गाठणारा हा देशातील पहिला सायकलपटू ठरला. सर्वसाधारणपणे प्रौढांसाठी असलेल्या सायकलची उंची ही २६ ते २८ इंचांची असते. मात्र, यापेक्षाही लहान सायकलची निवड करून अभिजितने विक्रमाचा पल्ला यशस्वीपणे गाठला आहे. त्याने १ नोव्हेंबर २०१८ रोजी हा पराक्रम गाजवला. या विक्रमी कामगिरीबद्दल त्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला. तो औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे. त्याने यादरम्यान कोणत्याही एनर्जी व इलेक्ट्रॉल या ऊर्जा वाढवणाऱ्या द्रव्यांचाही वापर केला नाही. 

 

जिद्दीने गाठला आव्हानात्मक पल्ला : 
अभिजितने २० इंच उंचीच्या सायकलवरून २०० किमीचे अंतर गाठण्यासाठी १ नोव्हेंबर २०१८ रोजी सुरुवात केली. तो सकाळी ६ वाजता क्रांती चौक येथून विक्रमाच्या मोहिमेला निघाला. त्याने सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी नगर जिल्ह्यातील टोलनाका परिसर गाठला. पाच तासात हे १०० किमीचे अंतर ठरले. त्यानंतर त्याने परतीच्या मार्गावरून सुरुवात केली. यादरम्यान त्याला कमी उंचीमुळे गुडघा अाणि पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र, त्याने याची पर्वा न करता मोठ्या जिद्दीने हा आव्हानात्मक पल्ला यशस्वीपणे गाठला. ता सायंकाळी ७ वाजता ते क्रांती चौक येथे दाखल झाला. 

 

अर्धा तास आधीच गाठले टार्गेट, आता हजाराचे अंतर गाठण्याचा निर्धार 
ऑडेक्स इंडियाच्या वतीने अभिजितला या २० इंची सायकलवरून २०० किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी टार्गेट देण्यात आले होते. यासाठी त्याला साडेतेरा तासांचा वेळ देण्यात आला. मात्र, अभिजितने हा विक्रमाचा पल्ला दिलेल्या टार्गेटपेक्षा अर्धा तास आधीच गाठला. यातून त्याला २०० किमीचे अंतर १३ तासांमध्ये पूर्ण करता आले. 

 

७.३० तासांचा लागला वेळ परतीच्या १०० किमीसाठी 
हा विक्रमाचा पल्ला यशस्वीपणे गाठल्यामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आता माझी नजर १,०००, १२००, १४०० किमी अंतर पूर्ण करण्यावर लागली आहे. यासाठीचा मी निर्धार केला आहे. आता मी या मोहिमेवर लवकरच निघणार आहे. अभिजित बंगाळे, विक्रमवीर सायकलपटू, औरंगाबाद 

 

विक्रमासाठी निवडली लहान सायकल 
अभिजितला बालपणापासूनच सायकलिंगची आवड होती. मात्र, यात वेगळे करण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने २० इंची सायकलची निवड केली. मात्र, हे आव्हानात्मक होते. त्याची उंची ५ फूट ६ इंच इतकी आहे. यातूनच ही लहान सायकल चालवताना त्याला निश्चितपणे दोन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, यावर मात करत त्याने हे अंतर पार केले. 
 

बातम्या आणखी आहेत...