आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मनपा निवडणुकीसाठी २ हजार पोलिस बंदोबस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - रविवारी हाेणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ३३७ मतदान केंद्रांवर २ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एकूण ७३ इमारतींमध्ये मतदान केंद्र आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. केडगाव, सारसनगर, मुकुंदनगर व सावेडीतील काही केंद्रे संवेदनशील आहेत. तेथे अतिरिक्त फौजफाटा व सीसीटीव्ही असतील. मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिस व महसूलची संयुक्त पथके गस्त घालत आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 


शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. निवडणूक प्रक्रियेत एकूण २ हजार मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या काढण्यात आल्या. वासुदेवांच्या तीन पथकांमार्फत मतदार जागृती करण्यात आली, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

 

१० डिसेंबरला भवानीनगर येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. ही जबाबदारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. या परिसरात १०० मीटरपर्यंत प्रवेश बंदी आहे. स्थानिकांना तात्पुरते वाहतुकीचे पास घरपोच दिले आहेत. मतमोजणी होईपर्यंत या भागाकडे येणाऱ्या रस्त्यांवर प्रवेशबंदी आहे. 
शहरात दोन दिवसांसाठी ८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली अाहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांचे पथक व्हिडीओ कॅमेऱ्यासह गस्त घालत आहे. केडगाव, मुकुंदनगर, सारसनगर व सावेडी भागात अधिक बंदोबस्त आहे. कोठेही मतदारांना प्रलोभन दाखवले जात असेल, तर पोलिस, भरारी पथके किंवा थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

दृष्टीक्षेपात बंदोबस्त 
१७ - एकूण प्रभाग, ६८ - जागांसाठी मतदान, ३३९ - उमेदवार मैदानात, ७४ - इमारतींमध्ये मतदान, ३३७ - मतदान केंद्रे, २ लाख ५६ हजार ७१९ - एकूण मतदार, ८ - व्हिडीओ सर्व्हेलंस टीम, ६ - स्टॅटिक सर्व्हेलंस टीम, ६ - निवडणूक आयोगाची भरारी पथके, २,००० - अधिकारी व कर्मचारी, असा आहे पोलिस बंदोबस्त - १ - पोलिस अधीक्षक, २ - अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ६ - पाेलिस उपअधीक्षक, ८५ - सहायक निरीक्षक व फौजदार, १,००० - पोलिस कर्मचारी, ५०० - होमगार्ड, १५० - एसआरपीएफ जवान, २०० - दंगल नियंत्रक पथकाचे जवान, १५० - राखीव पोलिस दलाचे जवान, १ - शीघ्र कृती दल पथक, १७ प्रभागांमध्ये गस्त घालण्यासाठी, १ - पोलिस अधिकारी, १ - पोलिस उपअधीक्षक, ५ - एसआरपीएफ प्लाटून, ६ - राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, ५ - पोलिस कर्मचारी (प्रत्येक पथकात) अतिसंवेदनशील मतदान केंद्रात -,१ - पोलिस निरीक्षक, १० - पोलिस कर्मचारी, ४ - होमगार्ड, संवेदनशील मतदान केंद्रात - १ - पोलिस अधिकारी, ५ - पोलिस कर्मचारी, २ - होमगार्ड, इतर मतदान केंद्रात -, १ - पोलिस अधिकारी, ३ - पोलिस कर्मचारी, २ - होमगार्ड, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क - मो. ७७५८०६०६०९. 

 

 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी करणार प्रभाग ११ मध्ये मतदान 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे स्वत: प्रभाग ११ मध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी व पोलिस अधीक्षक शर्मा यांनी केले. संध्याकाळी साडेपाचनंतर मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसराच्या आत असलेल्या सर्वांना नंबर देऊन मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...