2014 पीएम होण्यासाठी...चायवाला; 2019 पीएम पदी राहण्यासाठी...चौकीदार

Apr 01,2019 11:59:00 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीच्या तालकटोरा मैदानावरून ‘ मैं भी चौकीदार हूं’ अभियानाची सुरुवात करताना पक्ष समर्थकांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम ५०० हून जास्त ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. २०१४ मध्ये मी लोकांना स्पष्ट सांगितले होते. तुम्ही माझ्यावर दिल्लीची जबाबदारी सोपवत आहात. याचा अर्थ तुम्ही चौकीदाराची नेमणूक करू लागला आहात. सामान्य माणूस कर देतो. वेगवेगळ्या माध्यमातून योगदान देतो. त्यावर देशातील गरिबांचा हक्क असतो. मी कधीही त्यावर हात पडू देणार नाही. माेदी पुढे म्हणाले, २०१३-१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान मी देशासाठी नवीन होतो. बहुतांश टीकाकारांनीच मला जास्त प्रसिद्धी दिली. मी त्यांच्याविषयी आभार व्यक्त करतो. परंतु एक चौकीदार या नात्याने मी माझी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन. परंतु काही लोकांना बौद्धिक मर्यादा असतात. त्यामुळे त्यांचे विचारही संकोचलेले असतात. त्यामुळेच मनात चौकीदाराविषयीचा विचार बुरसटलेला असतो. चौकीदाराची काही व्यवस्था नसते. एखादा पोशाख म्हणजे चौकीदार नव्हे. चौकीदाराला एखाद्या चौकटीत बांधता येत नाही. चौकीदार एक स्पिरिट, एक भावना आहे, असे मोदींनी सांगितले.

राहुल यांच्या घोषणेला उत्तर म्हणून मोहिमेची सुरुवात
मोदींचा कार्यक्रम ऐकण्यासाठी दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर ५ हजारांहून जास्त लोक उपस्थित होते. त्याशिवाय देशाच्या विविध शहरांत पंतप्रधानांशी संवादासाठी ५०० बूथ तयार केले. त्यावर भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ मार्च रोजी या मोहिमेला सुरुवात केली होती.

मोहिमेचा परिणाम

2014

> मोदींनी २०१४ मध्ये २४ राज्यांत ४ हजार ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ केली होती. १० लाख लोक जोडले.
> एका दिवसात १ हजार ठिकाणी व जगात १५ देशांत ५० ठिकाणी कार्यक्रम झाले.

2019

> रविवारी पंतप्रधानांनी २९ राज्यांत ५०० ठिकाणी ‘मैं भी चौकीदार’ कार्यक्रम घेतला.
> पक्षात एक लाखाहून जास्त लोक सहभागी. सर्व मंत्री, मुख्यमंत्र्यांचा सहभाग : पक्षाचा दावा.

X