आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात 167 पैकी 29 घरफोड्या उघडकीस, जुन्या शहरातील दंगलींचा तपासही थंडावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कम्युनिटी पोलिसिंगमध्ये उत्तम कामगिरी करणारे शहर पोलिस दल पोलिसिंगमध्ये मात्र कमी पडताना दिसत आहे. वर्षभरात १६७ पैकी २९ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. तसेच दंगलीचा तपासही थंडावला आहे. वर्षभरात घडलेल्या गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला तेव्हा ही बाब समोर आली आहे. पोलिस आणि समाजातील अंतर दूर करण्यासाठी आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मात्र, घरफोडी, खून, दुचाकी चोरी, लूटमार आणि अवैध धंद्यावर आळा बसवण्यात पोलिस दल काही प्रमाणात कमी पडत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

 

महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देणे, वस्त्यांमध्ये वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करणे असे अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. मात्र, गंभीर गुन्ह्यांचा तपास अजून पोलिसांना लागलेला नाही. दंगलीसारख्या ज्या गुन्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. ऑनलाइन आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदवल्या गेले आहेत. परंतु, त्यांच्या शेवटापर्यंत पोलिस अजूनही पोहाेचू शकले नाहीत. बीड-बायपास वगळता शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यात अपयश आले. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. दोषसिद्धीचे प्रमाण वाढल्याचे शहर पोलिसांकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात सेशन कमिट म्हणजेच ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा आहे. 

 

२०१८ ची सुरुवातच कोरेगावच्या भीमा दंगलीने झाली 
२०१८ ची सुरुवातच दंगलीने झाली. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद शहरात उमटले. अनेक वस्त्यात दगडफेक, बंदबरोबरच पोलिसांवर हल्ले झाले. १ ते ४ जानेवारीपर्यंत हा तणाव कायम होता. त्यानंतर कचऱ्यामुळेदेखील शहरात तणाव निर्माण झाला. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अनेक भागात पोलिस आणि मनपाच्या पथकावर नागरिकांनी दगडफेक करत वाहने जाळली. ११ मे तर शहरासाठी काळरात्र होती. नवाबपुरा, राजाबाजार, जाफर गेट, शहागंज, सिटी चौक या परिसरात दंगल झाली होती. पोलिसांवर प्राणघातक हल्ले झाले. यादरम्यान पुंडलिकनगर परिसरात बॅनर फाडल्यावरूनदेखील शहरात तणाव निर्माण झाला होता. ९ ऑगस्ट रोजी मराठी क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या दरम्यान वाळूज एमआयडीसी परिसरात ७२ कंपन्यांची तोडफोड झाली. या सर्व घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा ताण आला. यंत्रणा वेठीस धरल्या गेली. मात्र, कुठल्याच प्रकरणात पोलिस निष्कर्षाप्रत पोहाेचू शकले नाहीत. या सर्व घटनांमध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप झाला झाला असावा. 

 

या खुनांचा तपास अजून पुढे सरकलाच नाही , मारेकरी अजूनही मोकाटच 
२०१२ मध्ये झालेल्या श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास तीळमात्रही पुढे सरकलेला नाही. अमिना बी खून प्रकरणात दोषी सापडल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. तो दोषी मागील पाच वर्षांपासून सापडलेला नाही. कागजीपुऱ्याच्या जंगलात १ मे २०१७ रोजी एका महिलेचा गळा चिरून मृतदेह फेकून दिला होता. त्याचीही ओळख पटलेली नाही. दौलताबादेत वर्षभरापूर्वी एका विहिरीत डाेके नसलेला पुरुषाचा मृतदेह सापडला होता. त्याची ओळख पोलिसांना करता आली नाही. मोंढा नाक्याजवळील काला बावडी परिसरात एका मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गळा चिरून मृतदेह पोत्यात भरून फेकून देण्यात आला होता. त्याचेही मारेकरी अजून मोकाटच आहेत. 

 

या गोष्टींमुळे मिळाली शाबासकी 
वर्धन घोडे खून प्रकरणात न्यायालयाने दोन्ही मारेकऱ्यांना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. एकही प्रत्यक्षदर्शी नसताना केवळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासाचे हे यश आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या आकांक्षा खून प्रकरणातील मारेकऱ्याला पोलिसांनी पर राज्यात जाऊन अटक केले. संकेत कुलकर्णी खून प्रकरणात पोलिसांना यश आले. 

 

या पोलिस ठाण्यांची उत्तम कामगिरी : 
शहर पोलिस दलात चुरस निर्माण व्हावी, गुन्हे प्रकटीकरण आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन इम्प्रूव्हमेंट सुरू करण्यात आले. वर्षभरातील कामगिरीमध्ये सिडको, एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा, उस्मानपुरा, मुकुंदवाडी पोलिसांची कामगिरी उत्तम आहे. 

 

अवैध धंद्यांवर कारवाई, मात्र धंदे सुरू 
पोलिसांनी अवैध धंद्यावर सातत्याने कारवाई केली आहे. तरीसुद्धा गोरखधंदे करणाऱ्यांवर वचक बसलेला नाही. त्यामुळे बनावट लॉटऱ्या विकणे, ऑनलाइन जुगार, अवैध गॅस रिफिलिंग सेंटर, जुगार, पत्त्यांचे क्लब, गुटखा, अवैध दारू विक्री, अमली पदार्थांची विक्री, वेश्याव्यवसाय, मोबाइल पळवणे, चाकूचा धाक दाखवून लुटणे, मंगळसूत्र चोरी, लग्न समारंभातील प्रकार सुरूच आहे. 

बातम्या आणखी आहेत...