आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालेकिल्ले अभेद्य राखण्याचे शिवसेना-भाजपसमोर आव्हान, जागा खेचून आणण्याचा आघाडीचाही निर्धार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई-ठाणे-कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भाजपनेही आपली ताकद येथे बऱ्यापैकी वाढवली आहे. एकूण ८ लोकसभा मतदारसंघांपैकी जागांपैकी ५ जागांवर शिवसेना तर ३ जागांवर भाजपचे खासदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून काही अपवाद वगळता शिवसेना आणि भाजपच या भागावर राज्य करीत आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेत मिळालेले यश कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. शिवसेनाही आपल्या आहे त्या जागा कायम ठेवून आणखी जागा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीही आपली ताकद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेस मात्र आपली गेलेली मत परत मिळवता येईल का या विवंचनेत आहे. याचे कारण म्हणजे मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये उघडपणे सुरू असलेले शीतयुद्ध आहे.

 

काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे ज्येष्ठ नेत्या प्रिया दत्त यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. काँग्रेसमधील या घडामोडी भाजपच्या पथ्थ्यावर पडणाऱ्या आहेत.. यामुळे कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला त्यांचा मतदारसंघ भाजप आपल्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आपल्या खासदारांमध्ये बदल करणार नसल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, शिवसेना मात्र काही नवीन चेहरे देऊ इच्छित आहे. सध्याच्या खासदारांनी गेल्या ५ वर्षात आपला मतदारसंघ चांगल्या प्रकारे बांधला आहे. आता त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला शिरकाव करू द्यायचा नाही असा निश्चय केला आहे. मुंबई ठाण्यामधील १० जागांसाठी ५१.६ टक्के मतदान झाले होते. यात भाजप-शिवसेनेला ५५ टक्के, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला २९.३ टक्के मते मिळाली होती.

 

ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला, नाईक यांची ताकद संपुष्टात?
ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण व ठाणे हे ३ लोकसभा, तर १८ विधानसभा मतदारसंघ येतात. गणेश नाईक राष्ट्रवादीत गेल्याने सेनेकडील ठाणे लोकसभेत राष्ट्रवादी २००९ मध्ये जिंकली होती. संजीव नाईकांनी सेनेचे खा. आनंद परांजपेंचा पराभव केला. मात्र २०१४ मध्ये राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा २ लाख ८१ हजार मतांनी पराभव करत जागा पुन्हा सेनेला मिळवून दिली. विचारे यांनाच पुन्हा शिवसेनेतर्फे तिकीट दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. गणेश नाईक यांची ताकद आता जवळजवळ संपुष्टात आली असल्याने येथे सेनेचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

कल्याण : शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना पुन्हा संधीची शक्यता 
कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे सध्या खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा यांचा पराभव केला. परांजपे दोन वेळा येथून खासदार निवडून गेले होते. खरे तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघात फारसा संपर्क नसतानाही ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेली मोलाची मदत आणि २०१४ मधील मोदी लाट यामुळे श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. या ठिकाणी मनसेचे प्राबल्य असतानाही शिवसेनेने विजय मिळवला होता. या वेळीही श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी दिली जाईल असे म्हटले जात आहे. 

 

दक्षिण मुंबई : काँग्रेसचा गड, देवरा पुन्हा मिळवणार का?
दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९६, ९९ आणि २०१४ चा अपवाद वगळता नेहमी काँग्रेसने येथे यश मिळवले आहे. अगोदर मुरली देवरा व नंतर मिलिंद देवरा यांनी येथे चांगला जम बसवला होता. परंतु २०१४ मध्ये अरविंद सावंत यांनी मोदी लाटेत यश मिळवले. मात्र पुन्हा ते आपला करिश्मा दाखवू शकतील की नाही, अशी शंका आहे. मिलिंद यांनी मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम आधीपासूनच सुरू केले आहे. अरविंद सावंत यांचा पत्ता कट करून तेथे दुसरा चेहरा देण्याचा विचार उद्धव ठाकरे करत असल्याचे सांगितले जात आहे.

 

दक्षिण मध्य : खा.राहुल शेवाळे यांच्या जागी दुसरा चेहरा शक्य 
हा मतदारसंघ आधीपासूनच सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तब्बल ७ वेळा येथून शिवसेनेचा खासदार जिंकलेला आहे. २००९ मध्ये काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेकडून ही जागा हिसकावली होती. त्या वेळी त्यांनी शिवसेनेच्या सुरेश अनंत गंभीर यांचा पराभव केला होता. परंतु काँग्रेस २०१४ मध्ये हा मतदारसंघ कायम राखू शकली नाही. २०१४ मध्ये सेनेच्या राहुल शेवाळेंनी येथे विजय मिळवला. विशेष म्हणजे, आता राहुल शेवाळे यांचेही मतदारसंघात विशेष काम नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेवाळे यांच्या जागी दुसरा चेहरा देण्याचा विचार सेनेत सुरू आहे.

 

उत्तर मध्य : काँग्रेसची अनास्था भाजपच्या पथ्यावर पडणार... 
हा मतदारसंघ आजवर एकाच पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. प्रत्येक वेळेस येथून वेगळ्या पक्षाला मतदारांनी कौल दिला आहे. काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी हा मतदारसंघ चांगला बांधून बालेकिल्ला बनवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु २०१४ मध्ये भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रिया यांचा पराभव केला. नंतर येथील काँग्रेसची ताकद संपल्यात जमा होती. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी रिंगणात उतरणार नसल्याची आधीच घोषणा केली आहे. संजय निरूपम हेही येथून निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. त्यामुळे भाजपला सलग दुसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याची संधी आहे.

 

उत्तर पूर्व : जागेवर शिवसेनेने दावा केल्याने सोमय्यांसह भाजपची गोची  
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राजकारणाच्या बदलत्या घडामोडींत त्यांच्या हातातून गेला. येथील मतदारांनी कधी शिवसेना, कधी भाजप तर कधी पुन्हा काँग्रेस असा संमिश्र कौल दिलेला आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील विजयी झाले. भाजपचे किरीट सोमय्या यांनी सतत चर्चेत राहून मतदारांची कामेही केली. यामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीत सोमय्या यांच्या पारड्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात आपला कौल दिला. विशेष म्हणजे निवडणुकीच्या ऐन तोंडावर सेनेने हा मतदारसंघ मागितल्याची चर्चा आहे. यामुळे सोमय्या यांच्या भवितव्याविषयी अचानक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

उत्तर पश्चिम : ९ वेळा काँग्रेसचा खासदार, निरुपम करणार दावा 
हा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. आतापर्यंत ९ वेळा या मतदारसंघाने काँग्रेसला कौल दिला होता.  शिवसेनेला फक्त तीन वेळा कौल दिला आहे. २०१४ मध्ये गजानन कीर्तिकर यांनी गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातील सहा मतदारसंघांवर शिवसेना-भाजपने विजय मिळवला. आता हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात जाणे कठीण दिसत आहे. त्यातच मतदारसंघात काम करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन झाले असल्याने काँग्रेसकडे त्यांच्या तोडीचा मोठा नेताही नाही. निरुपम येथून प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचा विजय कठीण आहे, असे म्हटले जात आहे.

 

मुंबई उत्तर : आजवर काँग्रेस-भाजपला मिळालीय समान संधी
हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र काँग्रेस आणि भाजपला समान संधी येथील मतदारांनी दिली आहे. येथून ६ वेळा भाजपचा तर ६ वेळा काँग्रेसचा खासदार जिंकला आहे. राम नाईकांनी १९९९ पासून सलग २५ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र  २००४ मध्ये काँग्रेसच्या गोविंदा यांनी नाईक यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसकडे परत आणला. २००९ मध्येही संजय निरुपम यांनी विजय मिळवत मतदारसंघ कायम ठेवला. परंतु २०१४ मध्ये गोपाळ शेट्टी यांनी मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणला. आता या मतदारसंघात भाजपने चांगली पकड बसवली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...