आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जलयुक्त\'वर २१ कोटी खर्च; जास्त पाऊस, मात्र पाणीसाठे चिंताजनकच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करता यावी, यासाठी राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवारचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. २१ कोटी रुपये खर्च करुन दोन हजारांपेक्षा अधिक जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. यावर्षी सरासरीपेक्षा थोडा का होईना अधिक पाऊस झाला. मात्र तरीही जिल्ह्यातील पाणीसाठे तळालाच गेल्याचे चित्र आहे.

 

> राज्यातील विविध जिल्हे, तालुके, गावांमध्ये सातत्याने निर्माण होणारी पाणी टंचाई, दुष्काळ आदी बाबी लक्षात घेवून २०१४-२०१५ या वर्षात भूजलाची २ मीटरने झालेली घट लक्षात घेवून राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील २२ जिल्ह्यातील १९ हजार ५९ गावांमध्ये हे अभियान राबवण्यात आले. या अभियानातून २०१९ पर्यंत राज्याला पाणी टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या अभियानात अकोला जिल्ह्याचाही समावेश होता. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १४४ गावांमध्ये जलयुक्त शिवारची २११३ कामे करण्यात आली. यासाठी २१ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा खर्च करण्यात आला.

 

> दरम्यान यावर्षी पावसानेही काही प्रमाणात साथ दिली. जिल्ह्याचे सरासरी पर्जनमान्य ६९७.३० मिलिमीटर आहे. तर ३० सप्टेंबर पर्यंत ७०१.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेने १००.६२ टक्केवारी पाऊस झाला. मात्र अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि पातूर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र तरीही या तालुक्यांमध्ये ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे जलयुक्त शिवारची कामे हाती घेतल्याने पाणी टंचाई कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र चांगला पाऊस आणि मोठी कामे होऊनही टंचाईस्थिती गंभीर अवस्थेत पोहोचण्याचे चित्र आहे. 

 

असा पाऊस अशी भूजलाची घट 

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६९७.३० मि.मी.आहे. ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ७०१.६० मि.मी.पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेने १००.६२ टक्के पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेने ०.६२ टक्के अधिक पाऊस झाला. तर जिल्ह्याची पाच वर्षाची पाण्याचे(भूजलाची) पातळीची सरासरी ८.८२ मी.ने खोल आहे. मात्र अधिक पावसाची नोंद होवूनही सप्टेंबर २०१८ मध्ये भूजलाची पातळी १०.२८ मी. खोल गेली आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या भूजलाच्या पातळीत १.४५ मी.ने घट झाली.

 

शास्त्रोक्त पद्धतीने पाणी जिरवणे आवश्यक 

पाऊस किती पडला? यापेक्षा पाऊस कसा पडला? ही बाब महत्त्वाची आहे. काही वर्षात मुरवणी पाऊस बंद झाला. आता पावसाची तीव्रता, वेग वाढला तर दुसरीकडे पावसाचे दिवस कमी झाले. त्यामुळेच भूजलाच्या पातळीत वाढीसाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. या पद्धतीने पाणी जिरवल्यासच पाणी पातळीत वाढ शक्य आहे. डॉ.सुभाष टाले, जलतज्ज्ञ,कृषी विद्यापीठ. 

 

तालुकानिहाय जलयुक्त शिवार योजना

तालुका पाऊस भूजल सरासरी सप्टें.भूजल पातळी घट-वाढ 
अकोला ७८९.५० ५.९७ मीटर ६.२९ मीटर ०.३२ मीटरने घट
बाटा ९३९.९० ४.६५ मीटर ४.५९ मीटर ०.०६ मीटरने वाढ 
अकोट ५५६.१० ९.०० मीटर ११.७९ मीटर  २.७९ मीटरने घट 
तेल्हारा  ४२८.८० १८.८७ मीटर   २३.३५ मीटर ४.४८ मीटरने घट
बाळापूर  ५७९.४० १२.१८ मीटर  १३.८६ मीटर  १.६८ मीटरने घट 
पातूर ७००.४० ५.३९ मीटर  ५.४१ मीटर  ०.०२ मीटरने घट 
मूर्तिजापूर   ९१७.१०   ५.७१ मीटर ६.६५ मीटर  ०.९४ मीटरने घट 

 

 

बातम्या आणखी आहेत...