आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाअंतर्गत नव्याने २१ महाविद्यालये होणार; पाच वर्षांचा आराखडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठात येत्या पाच वर्षात पारंपरिक व व्यावसायिक अशी २१ नवीन महाविद्यालये सुरू होतील. पुढील शैक्षणिक वर्षी यातील आठ महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातील एक महाविद्यालय विद्यापीठ स्वत: सुरू करणार आहे. 


या पत्रकार परिषदेला संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, क्रीडा विभाग संचालक डॉ. एस. के. पवार, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणाऱ्या सात महाविद्यालयांसाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. विद्यापीठ नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाबरोबरच विविध कौशल्याभिमुख व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 


त्यामुळे नव्याने सुरू होणाऱ्या आठ महाविद्यालयांपैकी दोन महिला महाविद्यालये असतील. एक रात्र महाविद्यालय, एक फार्मसी तर तीन पारंपरिक अभ्यासक्रमांचे महाविद्यालय असेल. इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव १ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाकडे पाठवावेत, असे अावाहन करण्यात आले आहे. 


पाच वर्षाचा टप्पा 
पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने सोलापूर विद्यापीठ २१ महाविद्यालयांना मान्यता देईल. यात काही नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. पहिल्यांदा सांगोला, अक्कलकोट येथे खास ग्रामीण भागातील मुलींसाठी महिला महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पंढरपूर येथे रात्र महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर येथे प्रत्येकी एक पारंपरिक महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यात एक फार्मसी व सोलापूर शहरात विद्यापीठाकडून कौशल्य विकास महाविद्यालय सुरू केले जाणार आहे.
- प्रा. डॉ.व्ही. बी. पाटील, संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी, सोलापूर विद्यापीठ 


प्रगतशील विद्यापीठामध्ये सोलापूर राज्यात चौथे 
प्रगतिशील विद्यापीठाच्या दृष्टीने माध्यमसमूहाच्या सर्वेक्षणामध्ये सोलापूर विद्यापीठाचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक लागला आहे. तर देशातील एकूण ९०० विद्यापीठांपैकी प्रगतशील विद्यापीठामध्ये सोलापूरचा पहिल्या शंभरमध्ये समावेश आहे. याचबरोबर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून अनुदान मिळवण्यात सोलापूर विद्यापीठ राज्यात दुसऱ्या स्थानी आहे.
- डॉ. मृणालिनी फडणवीस , कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ 

बातम्या आणखी आहेत...