Politics / मतमोजणी वाद : ईव्हीएमचा संशयकल्लोळ, 22 विरोधी पक्ष तिसऱ्यांदा आयोगाच्या दारात !

लोकांच्या मतांशी निगडित निर्माण झालेला हा संशय दूर करणे ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही व्यक्त केले

दिव्य मराठी नेटवर्क

May 22,2019 08:45:00 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या ४८ तास आधी मंगळवारी ईव्हीएममधील गडबडीच्या आरोपांवरून वाद सुरू झाला. विविध २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली. गेल्या चार महिन्यांत विरोधी पक्षांचे नेते तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाकडे गेले आहेत. लोकांच्या मतांशी निगडित निर्माण झालेला हा संशय दूर करणे ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही व्यक्त केले आहे, तर भाजपने विरोधकांचे आरोप नाकारत म्हटले की, मोदी पंतप्रधान झाले तर विरोधकांनी पराभवाचा स्वीकार करावा.


दरम्यान, मतमोजणीच्या सुरुवातीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची जुळणी करा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. समजा त्यात काही गैर आढळले तर त्या विधासभा मतदारसंघातील सर्व केंद्रातील मतांची जुळणी करावी. देशातील अनेक भागांतील ईव्हीएम अदलाबदलीच्या दाव्यांबाबत आयोगाने स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. ईव्हीएमच्या अदलाबदलीचे तसेच त्यात गडबड झाल्याचे दावे निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित असल्याचे आयोगाने सांगितले. तत्पूर्वी काही तास आधीच सर्वोच्च न्यायालयाने सर्व ईव्हीएममधील डेटा व्हीव्हीपॅटशी जुळ‌वण्याची मागणी फेटाळली होती.


व्हीव्हीपॅटची मते पहिल्यांदा मोजणीबाबत आज निर्णय : प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील मते मतमोजणीच्या आधी जुळणी करा या मागणीवर आयोग बुधवारी निर्णय घेणार आहे. प्रचलित प्रक्रियेत ही जुळणी मतमोजणीच्या शेवटी होते.


डिनर डिप्लोमॅसी : एनडीएचे ३९ पैकी ३६ नेते हजर
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची बैठक घेतली. भाजपच्या मुख्यालयात ही बैठक दोन तास चालली. मोदी यांनी दावा केला की, एक्झिट पोलपेक्षा निवडणुकीचे निकाल चांगले असतील. एनडीएचेच सरकार होईल. या सरकारमध्ये काही जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार नाही. नव्या सरकारची स्थापना निकालानंतरच्या राजकीय-सामाजिक समीकरणांच्या आधारे होईल. स्नेहभोजनासाठी एनडीएतील ३९ घटक पक्षांपैकी ३६ पक्षांचे नेते उपस्थित होते.


तर रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील : कुशवाहा
पाटणा - महाआघाडीने एक पत्रकार परिषद घेत आव्हान दिले. कधीकाळी मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले आरएलएसपीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा म्हणाले की, महाआघाडीच्या समर्थकांना हिणवण्यासाठी एक्झिट पोलचा दाखला दिला जात आहे. त्यांनी धमकावले की, लोकांत एवढा संताप आहे की रक्तपात झाल्यास त्यासाठी नितीशकुमार आणि केंद्र सरकार जबाबदार असेल. हे लोक काहीही करू शकतात. निकालात गैरप्रकार झाला तर रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहतील.


संशय दूर करणे ही आयोगाची जबाबदारी : प्रणव मुखर्जी
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ईव्हीएममधील गडबडीच्या वृत्तावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आमच्या लोकशाहीच्या मूळ आधाराला आव्हान देणाऱ्या अटकळींना स्थान असू शकत नाही. जनादेश पवित्र आहे. तो सर्व प्रकारच्या संशयापासून मुक्त असावा. संस्थात्मक रचनेवर माझा विश्वास आहेच, परंतु माझा सल्ला आहे की, काम करणारेच हे ठरवतात ती संस्थात्मक टूल्स कसे राबवावेत. या प्रकरणात संस्थात्मक अखंडता निश्चित करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. मात्र, सोमवारी ते म्हणाले होते की, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक उत्तम पद्धतीने पार पाडली.

X
COMMENT