आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिट्टीघाट येथे योगेश्वरी वसतिगृहातील २१ विद्यार्थ्यांना चिवड्यातून विषबाधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 केज/नांदूरघाट -  चिवडा आणि करंज्या खाल्ल्याने मळमळ, उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने  योगेश्वरी वसतिगृहातील २१ विद्यार्थ्यांना प्रथम नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात  व नंतर बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार   बुधवारी  रात्री ११ वाजता घडला. 


पिट्टी घाट येथील तांबडे वस्तीवरील योगेश्वरी वसतिगृहात जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची १७० मुले असून वसतिगृह चालकाच्या शाळेतच शिक्षण घेतात. वसतिगृहातील  काही मुलांना त्यांच्या आईवडिलांनी चिवडा आणि करंज्या सोबत दिल्या होत्या. बुधवारी सकाळी त्यांनी नाश्त्यात त्याचे सेवन केेले.  २१ विद्यार्थ्यांना  उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना राजेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर डॉक्टरांनी  गोळ्या व औषध दिल्याने ते वसतिगृहात परतले. मात्र रात्री उशिरा पुन्हा या विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास वाढल्याने नांदूरघाटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यात कृष्णा काळे (१४ ), ओम जाधव (१० ), आदित्य नवाणे (१२ ), ओंकार आडे (१६ ), अविनाश आनंद ढाकणे (१२ ), अमर  आवारे (११ ), अनिल काळे (१४ ), दीपक शिवाजी काळे (१३ ) या आठ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 


घटनेची माहिती मिळताच केज ठाण्यातील फौजदार सिद्धे, जमादार बाळकृष्ण मुंडे, दिनकर पुरी, अशोक नामदास यांनी रुग्णालयाला भेट दिली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी  वसतिगृहात जाऊन पाणी आणि अन्नाची पाहणी केली. अन्न उरले नसल्याने पोलिसांनी हौदातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले.   

 

अन्न अथवा पाण्यातून ही बाधा झाली 
मुलांना उलट्या, जुलाब, ताप येऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ही बाधा कशातून झाले हे सांगता येत नाही. मात्र अन्न अथवा पाण्यातून ही बाधा झाली असावी. 
डॉ. महानंदा मुंडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, नांदूरघाट.