आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी २१ हजार पालक इच्छुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रसेन देशमुख 

उस्मानाबाद - भारतीय समाज व्यवस्थेत मूल नाकारण्याची, विविध कारणांमुळे मूल रस्त्यावर सोडण्याची मानसिकता असली तरी मूल न होणाऱ्या लाखो दांपत्यांना मात्र दत्तक मुलाची आस आहे. देशातील आणि परदेशातील सुमारे २१ हजार दांपत्यांनी भारतीय मूल दत्तक घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. मागणी मोठी असली तरी देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अनाथ मूल नसल्याने व तांत्रिकदृष्ट्या त्याची पूर्तता होत नसल्याने सहा वर्षांत देशातील २० हजार २११ मुलांनाच पालक मिळाले आहेत.

विवाहपूर्व अनैतिक संबंध, पोटी मुलगी आल्यामुळे, कौटुंबिक वादातून लहानपणीच असंख्य मुले अनाथ होतात. अशा बालकांना चाइल्ड लाइनसारख्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या शिशू बालगृहात किंवा बालसुधारगृहात पाठवण्यात येते. अशा मुलांचे संगोपन शासन करते. मात्र, बालकांना दत्तक घेण्यासाठी काही पालक इच्छुक असल्यास त्यांना सेंटर अॅडॉप्शन  रिसोर्स अॅथाॅरिटी (cara) या संस्थेकडे ऑनलाइन मागणी करावी लागते. गेल्या सहा वर्षांत २० हजार २११ दांपत्यांनी अनाथ मुले दत्तक घेतली आहेत. देशातील १६ हजार ८५९ तर परदेशातील ३ हजार ३५२ दांपत्यांचा समावेश आहे.  या संस्थेकडे सध्या २१ हजार नागरिकांनी मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

एकीकडे दररोज मुलांना अनाथ करण्याचे अमानवीय कृत्य सुरू असले तरी अनाथ झालेल्या अशा मुलांना घरी नेण्यासाठी लाखो पालक आसुसलेले आहेत. एकाच देशात माणसातला हा विसंगतपणा अनाकलनीय आहे. अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये विदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असल्याने बालकांमध्ये मायेचा झरा शोधणाऱ्यांची संख्या वाढत आहे, हेही अधोरेखित होते.
 

अशी आहे मूल दत्तक घेण्याची पद्धत 
सेंटर अॅडॉप्शन रिसोर्स ऑथोरिटी (cara) या शासकीय संस्थेकडे ऑनलाइन पद्धतीने मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज करता येतो. यामध्ये इच्छुक दांपत्याची कौटुंबिक, आरोग्यासह आर्थिक उत्पन्नाची माहिती द्यावी लागते. मूल दत्तक घेणाऱ्या एका पालकाचे वय किमान ४५ किंवा जास्तीत जास्त ५५ असणे आवश्यक आहे. किंवा दोन्ही पालकांचे एकत्रित वय जास्तीत जास्त ११० वर्षे असल्यास त्यांना वयानुसार मूल दत्तक घेता येते.
 

नियमबाह्य दत्तक पद्धत
प्रचलित परंपरेनुसार नात्यांतील मुलांना दत्तक घेतले जात होते. अजूनही अनेक कुटुंबात अनाथ झालेल्या मुलांना नात्यातील व्यक्ती किंवा पोटी मूल न जन्मणाऱ्या दांपत्याकडून  दत्तक घेतले जाते. मात्र ही बाब कायदेशीरदृष्ट्या गैर आहे.
 

मुलांना अनाथ करू नका 
एकीकडे मुले नाकारली जात असताना ज्यांच्या पोटी आयुष्यभर मूल जन्माला येऊ शकत नाही, अशा वंध्यत्व दांपत्याला मुलांचे महत्व प्राप्त होते. चाइल्ड लाइनकडे अलेल्यांपैकी अनेक मुले कौटुंबिक वादातून अनाथ झालेली आहेत. त्यामुळे मुलांना अनाथ करू नका.
-डॉ.दिग्गज दापके-देशमुख, संचालक, चाईल्ड लाईन, उस्मानाबाद