आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारावर चालून जाणार रातरागिणी, 'मौन सोडू, चला बोलू'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : २२ डिसेंबर म्हणजे वर्षातली सगळ्यात मोठी रात्र. यंदा महाराष्ट्रातील २२ शहरांत एकाच दिवशी महिला घराबाहेर पडून, 'नाइट वॉक' करणार आहेत. 'दिव्य मराठी'च्या 'मौन सोडू, चला बोलू' अभियानाचा हा पुढचा टप्पा आहे. हा नाइट वॉक म्हणजे जगण्याचा जल्लोष असेल. स्त्रीत्वासोबत माणूसपणाचे सेलिब्रेशन असेल. रंगारंग कार्यक्रम असतील. धमाल मैफली रंगतील. रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो महिला एकवटतील. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, अमरावतीसह २२ शहरांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी हा 'नाइट वॉक' होत असताना, रात्रीच्या या भूकंपाने व्यवस्था हादरणार आहे. चिरेबंदी वाड्यांना तडे जाणार आहेत.

इनफ इज इनफ! खूप झालं आता. कधी पोटच्या मुलीवर बलात्कार होतो, तर कधी नराधमांच्या तावडीतून आईही सुटत नाही. गर्भात ती असुरक्षित, रस्त्यावर एकाकी आणि घरातही अगतिक.

एवढं होऊनही अशी श्वापदं मोकाट फिरत असतात आणि जेरबंद केलं जातं ते महिलेलाच. तुम्ही कपडे असे घालू नका, तुम्ही रात्री घराबाहेर पडू नका. सातच्या आत घरी पोहोचा.

आता बस्स! ही व्यवस्थाच लाथाडण्याची आणि असे सांगणाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची वेळ आली आहे. आता आक्रमकपणे या अंधारावर मात करावी लागणार आहे. 'ती' कोणासोबत बोलते, कोणासोबत चालते, एवढीच चर्चा करत जे तिला अग्निपरीक्षा घ्यायला सांगतात, त्यांना हे विचारलं पाहिजे की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? स्त्रीच्या इच्छेशिवाय तिला स्पर्श करण्याचा अधिकार यांना कसा मिळाला? आज महिला बोलू लागली आहे. त्यामुळे किमान नोंद तरी होते आहे या गुन्ह्यांची. आजवर तर व्यवस्थेने किती स्त्रियांना संपवले, याची आकडेवारीही नाही.

आधुनिकीकरणाच्या गप्पा मारताना आपण थकत नाही आणि दुसरीकडे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलत नाही. कोणत्याही रूपात स्त्री पुढे आली, तरी त्यांना तिचे शरीरच दिसते. एखादी स्त्री रस्त्यावर दिसली तर कशा पद्धतीने हे तिच्याकडे बघतात? खासगी गप्पांमध्ये महिलांवरून कसले-कसले फालतू जोक्स सुरू असतात! आणि, हे करणाऱ्यांना वयाचे बंधन नाही, तसेच व्यवसाय अथवा जाती-धर्माचेही नाही.

निर्लज्जपणे स्त्री दाक्षिण्याच्या गप्पा ठोकणारे आणि स्त्रीला देवीच्या गाभाऱ्यात बसवणारे प्रत्यक्षात काय विचार करत असतात स्त्रीबद्दल?


हे सगळे घडत असताना आरोपीच्या पिंजऱ्यात बाईच. कोणी तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले, तर तीच जबाबदार. विनयभंग केला तरी तीच दोषी. बलात्कार झाला म्हणजे तीच अपराधी. मग तिला बंद करून टाका पिंजऱ्यात. तिला कोंडून टाका. तिच्यावर बंधनं घाला. छान सजलेली, मोकळीढाकळी, रात्री- अपरात्री बाहेर पडणारी एखादी महिला दिसली की तिच्या चारित्र्यहननासाठी यांच्या फौजाच कार्यरत. 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता' असे म्हणायचेच मुळी एवढ्यासाठी, कारण तिनं बाकी आयुष्य जगू नये. पुरुष मात्र अनंतकाळचे पुरुषच! आणि, 'पुरुष' म्हणजे काय, हेही वेगळं सांगण्याची गरज नाही.

अशी व्यवस्था झुगारण्यासाठी आता महिला उतरताहेत रस्त्यावर. हा संदेश महाराष्ट्र पाठवेल देशभर.या रात्री रस्त्यावर उतरलेली प्रत्येक 'ती' पणती होत जाईल आणि हीच सामूहिक मशाल अंधाराला नामशेष करत नवी प्रकाशवाट दाखवेल

या रात्री रस्त्यावर उतरलेली प्रत्येक 'ती' पणती होत जाईल आणि हीच सामूहिक मशाल अंधाराला नामशेष करत नवी प्रकाशवाट दाखवेल...

तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश
है

औरंगाबादेतही महिलांचा नाइट वॉक..  


- रात्री १० ते पहाटे १पर्यंत हा नाइट वॉक चालेल 
- 'दिव्य मराठी'चा पुढाकार असला, तरी शहरातील सर्व महिलांचा हा 'नाइट वॉक' आहे. त्यामुळे सर्वांच्या सहभागानेच हा 'नाइट वॉक' दमदार होणार आहे.
- त्यामध्ये सुमारे पाच हजार महिला सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
- अन्य तपशील उद्याच्या अंकात असतील. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी या क्रमांकावर बोलावे... 
९५६१७४८७७८/ ७५०७७७७२६८