आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची धडक कारवाई, जामनेरात २२ लाखांचा गुटखा व ३ वाहने जप्त ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- भुसावळ रोडवरील गारखेडा शिवारात असलेल्या विजया फायबर्स या जिनप्रेसमध्ये रविवारी (ता. १३ रोजी) गुटख्याचा ट्रक खाली केला जात होता. त्याचवेळी जळगावच्या पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसह एलसीबीच्या पथकाने छापा टाकून २२ लाख रूपये किमतीच्या गुटख्यासह तीन वाहने ताब्यात घेतली आहेत. तर एक मालवाहू ट्रॅक्स घेऊन चालक पसार झाल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. याबाबत रात्री उशिरापर्यंत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. 


जामनेर येथे मोठ्याप्रमाणावर गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिस मुख्यालयाकडे होती. गेल्या काही दिवसांपासून मुख्यालयातील यंत्रणा गुटखा आणणाऱ्या वाहनांच्या मागावर होते. अखेर रविवारी टिप मिळाल्याने पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्थानिक पोलिस किंवा अन्य पथकांवर विश्वास न ठेवता थेट मुख्यालयातील चौघांना गारखेडा येथे पाठवले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाला भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा येथे पाठवले. पुढील सूचना मिळेपर्यंत एलसीबी पथकाला कुऱ्हा येथेच थांबण्याचे आदेश होते. मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याचा ट्रक (एम.एच.१८, एम.७२०९) हा गारखेडा शिवारातील विजया फायबर्समध्ये आला. त्यापाठोपाठ एम.एच.१९, एस.१४८१ या क्रमांकाची बोलेरो पीकअप व एम.एच.१९, एस.२०१९ या क्रमांकाची बोलेरो पीकअप या दोन गाड्या जिनप्रेसमध्ये आल्या. जिनप्रेसमध्ये ट्रकमधील गुटखा एका गोदामासह आलेल्या दोन बोलेरो पीकअपमध्ये भरला जात होता.

 

या वेळी मुख्यालयाच्या पोलिसांनी ही माहिती एलसीबी पथकाला कळवून त्यांना घटनास्थळी बोलावून घेत धाड टाकली. तत्पूर्वी एक बोलेरो पिकअप घेऊन वाहनचालक निघून गेला होता. गुटखा खाली केला जात असल्याची खात्री होताच पोलिस पथकाने अन्न व औषध विभागाशी संपर्क साधून संबंधीत अधिकाऱ्यांना पाचारण केले. अन्न व औषध विभागाचे अधिकारी अनिल गुजर यांनी गुटख्याचा पंचनामा केला. 


यांनी केली कारवाई 
पोलिस उपनिरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मुख्यालयातील कर्मचारी प्रकाश वाघ, दिलीप कोल्हे, भूषण परदेशी, रमेश खोडपे, एलसीबीचे एएसआय सुभाष पवार, मंगलसिंग पाटील, इद्रिस खान पठाण, दादाभाऊ पाटील, मुरलीधर बारी यांनी ही कारवाई केली. कारवाईपुर्वी सर्वांचे मोबाईल पोलिस उपनिरीक्षक शिंपी यांच्याकडे जमा केले होते. 


तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई 
पोलिसांनी धाड टाकल्यानंतर आलेल्या अन्न व औषध अधिकारी गुजर यांनी पंचनामा केला. यात ५० पोत्यांमध्ये १९८० सुगंधित सुपारी तर २०२० पाकिटे व्ही. वन तंबाखू असा २२ लाख रूपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती पत्रकारांना दिली. हा गुटखा राकेश हिरालाल संचेती या विक्रेत्याचा असून त्यांच्यासोबत चालक अब्दूल सलीम अब्दूल करीम, दिनकर भील हे चालक होते. एक चालक गाडी सोडून पसार झाला आहे. सायंकाळी पाच वाजेपासून ही कारवाई सुरू होती. तालुक्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिस सुत्रांचे म्हणने आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...