आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पिंपळगाव रेणुकाई- सासरच्यांसोबत नेहमीच्याच वादामुळे पतीसोबत काडीमोड घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन दिवसांत ही प्रक्रियाही पार पडणार होती. परंतु, तत्पूर्वीच विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला. ही घटना भोकरदन तालुक्यातील लेहा येथे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी माहेरचे नातेवाइक आल्यानंतर चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पूजा रामसिंग राजपूत (२२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे तिच्या मावस बहिणीचे रविवारीच लग्न होते.
लेहा येथील रामसिंग राजपूतचा विवाह ३ वर्षांपूर्वी तळणी (ता. सिल्लोड) येथील पूजा हिच्याशी झाला होता. लग्नानंतर दोन वर्षे त्यांचा संसार कसा-बसा चालला. त्यांना एक मुलगीही झाली. मात्र गेल्या वर्षीपासून त्यांच्यातील वाद वाढत गेल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पार पडणार होती. मात्र रविवारी सकाळी पूजा अचानक घरातून बेपत्ता झाली. ती घरात कुठेच दिसत नसल्याने घरच्यांनी शोधा-शोध केली असता त्यांच्याच शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. पोलिस पाटील दिलीप वखरे यांनी घटनेची माहिती पारध पोलिसांना कळवली. सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, पोलिस कर्मचारी सिनकर, डुकरे यांनी मृतदेह विहिरीतून काढून उत्तरीय तपासणीसाठी वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. दरम्यान, पूजाच्या माहेरच्यांनी लेहा येथे पोहोचताच टाहो फोडला. दोन दिवसांत घटस्फोट होणार होता. आजच मृत्यू कसा झाला, असे म्हणत सासरच्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, पतीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. दरम्यान, याप्रसंगी काही काळ तणाव निर्माण झाला होती. शेवटी पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल येऊ द्या, दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. या प्रकरणी पारध पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मावस बहिणीच्या लग्न दिवशीच झाला मृत्यू
मृत पूजा ही अडीच महिन्यांची गरोदर होती. विशेष म्हणजे रविवारीच तिच्या मावस बहिणीचे लग्न असल्याने ती दोन दिवसांपासून लग्नाला जायची गडबड करीत होती. मात्र, लग्नाच्याच दिवशीच ही दुर्देवी घटना घडली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.