आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली- राज्यात पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतरही उशीरा येण्याचे अंगवळणी पडलेल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी गुरुवारी (ता.12) जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद करून उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यामध्ये 25 कर्मचारी सापडले असून आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
राज्यात पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतरही काही कर्मचारी कार्यालयात उशीरानेच येऊ लागले आहेत. या कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर येण्याची शिस्त लागावी यासाठी प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी मागील आठवड्यात सकाळी 9.45 वाजता जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद करून घेतले. त्यानंतर उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली. यामध्ये 77 कर्मचारी उशीराने आले होते. या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना वेळेत कार्यालयात यावे अन्यथा कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सुचना माळी यांनी दिल्या होत्या. त्यांच्या इशाऱ्यानंतर काही दिवस कर्मचारी वेळेवर आले.
मात्र आज पुन्हा 9.45 वाजता कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामधे 25 कर्मचारी उशीराने आल्याचे स्पष्ट झाले. त्यांची नांवे व त्यांचा विभाग नोंदवून घेण्यात आला आहे. मागील वेळी उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांची नांवे आजच्या यादीत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी यु. एल. हातमोडे यांना या संदर्भातील माहिती तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता लेटलतीफ कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यात अडकणार आहेत.
कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामे करावीत- धनवंत माळी
शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतरही काही कर्मचारी उशीराने येत असल्याने गावकऱ्यांची कामे रखडली होती. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर प्रवेशद्वार बंद करून उशीरा येणाऱ्यांची नोंद घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी हि उपाय योजना केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.