आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची 25 हजार पदे रिक्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील भरती २०१० पासून बंद आहे. त्यामुळे टीईटीच्या चार पूर्वपरीक्षा देऊनही भावी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भरती करण्याचे आश्वासन अनेक वेळा दिले खरे, पण ते फोल ठरले आहे. त्यामुळे राज्यात प्राथमिक शिक्षकांची २५ हजारांवर पदे रिक्तच आहेत. या रिक्त पदांमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असून भावी शिक्षकांवर बेकारीचे जीवन जगण्याची वेळ ओढवली आहे.

 

आठ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. दुसरीकडे दरवर्षी मोठ्या संख्येने शिक्षक निवृत्त होत आहेत. यामुळे गत दहा वर्षांत झपाट्याने शिक्षकांची २५ हजारांवर पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे आज जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, कँटोनमेंट बोर्ड, अशा विविध शाळांत शिक्षकांचा मोठा अभाव निर्माण झाला असून अनेक शाळांची जबाबदारी ही एका शिक्षकाला सांभाळण्याची नामुष्की ओढवली आहे.


शेकडो शाळांमध्ये विज्ञान, गणित, इंग्रजी शिकवण्यासाठी त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक नाहीत. यंदाचे शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले आहे. परंतु, अनेक शाळांत शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. यामुळे पालक संतप्त झाले असून ते शाळांना कुलूप ठोकून निषेध व्यक्त करत आहेत.

 

दुसरीकडे सध्या कार्यरत शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचे ओझे टाकल्यामुळे मुलांना शिकवावे की ही कामे करावीत, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर २०१३ ते २०१८ मध्ये झालेली टीईटीत पात्र असूनही नोकरी न मिळाल्याने असंख्य भावी शिक्षक बेकारीचे जीवन जगत आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

 

नोंदणीला ठेंगा : शिक्षक भरती पारदर्शकपणे राबवण्यासाठी राज्य सरकारने पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया राबवली. त्याला मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, यास शैक्षणिक संस्थेकडून ठेंगा दाखवण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. यामुळे भरती लांबणीवर पडत चालली असून भरतीचा कृती कार्यक्रमही जाहीर केलेला नाही.

 

संयम संपला
२०१० पासून शिक्षक भरती बंद आहे. यामुळे महाराष्ट्रात २५ हजारांवर शिक्षकांची पदे रिक्त राहिली आहेत. यास सरकार जबाबदार आहे. आता अंत पाहू नका, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल. - सज्जन मुंडे, पदाधिकारी, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन.

 

बातम्या आणखी आहेत...