Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | 250 tigers are in Maharashtra, 20 percent increased from last year

राज्यात २५० वाघ; यंदा संख्येत २० टक्के वाढ, गणनेचा अहवाल केंद्रीय संस्थेकडे सोपवला, लवकरच अधिकृत घोषणा

प्रतिनिधी | Update - May 31, 2019, 08:32 AM IST

बछड्यांचीही संख्या तितकीच, जनगणनेत नसतो समावेश

 • 250 tigers are in Maharashtra, 20 percent increased from last year

  नागपूर- महाराष्ट्रात वाघांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असल्याचे २०१८ मध्ये पार पाडण्यात आलेल्या गणनेतून स्पष्ट होत आहे. येत्या काही दिवसांत भारतीय वन्यजीव संस्थान या केंद्रीय संस्थेकडून गणनेची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.


  २०१८ मध्ये देशव्यापी व्याघ्र गणनेची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. त्यानंतर वाघांचे अस्तित्व असलेल्या सर्व राज्यांनी डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानकडे व्याघ्र गणनेचा अहवाल सोपवला आहे. वाघांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी वन्यजीव संस्थानने नवी पद्धत विकसित केली असून त्यात वाघांची गणना करताना ‘डुप्लिकेशन’ होण्याची शक्यता जवळपास नसल्याचे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

  या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील वाघांची संख्या सुमारे २४५ ते २५० दरम्यान पोहोचल्याचे व्याघ्र गणनेच्या प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले अाहे. विशेष म्हणजे वाघांच्या बछड्यांचीही संख्याही जवळपास तेवढीच आढळून आली आहे. मात्र, नियमानुसार व्याघ्र गणनेत बछड्यांची संख्या गृहीत धरण्यात येत नाही. २०१४ च्या गणनेत राज्यात वाघांची संख्या २०४ च्या आसपास होती.

  अवनी प्रकरणाचे गालबोट
  व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने २०१८ हे वर्ष अत्यंत वाईट गेले होते. नोव्हेंबरमध्ये अवनी वाघिणीच्या शिकार प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले होते. याशिवाय मानव-वन्यजीव संघर्षाच्या ४० हून अधिक घटना घडल्या होत्या. २०१० च्या व्याघ्र गणनेत राज्यात वाघांची संख्या १८५ च्या आसपास होती. राज्यात ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट, सह्याद्री आणि बोर व्याघ्र प्रकल्पांचा प्रामुख्याने समावेश आहे. वाघांची सर्वाधिक संख्या या क्षेत्रांमध्येच एकवटली असली तरी व्याघ्र प्रकल्पांशिवाय अन्य वनक्षेत्रांमध्येही वाघांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


  उपाययोजना जनतेच्या सहकार्याने शक्य
  व्याघ्र क्षेत्रात वन विभागाने केलेल्या उपाययोजना व वन क्षेत्रालगतच्या जनतेच्या सहकार्यामुळे हे शक्य होत आहे. व्याघ्र संरक्षणासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला. गणनेची आकडेवारी अधिकृत स्वरूपात केंद्रीय संस्थांकडूनच जाहीर होईल. २०१४ च्या पाहणीत देशभरात वाघांची संख्या २,२२६ च्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले होते.
  - सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

Trending