आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - राजस्थानच्या अल्वर, अजमेर, धौलपूरच्या ६ लाख घरांत राहणाऱ्या ३५ लाखांहून जास्त लोकांचे आयुष्य बदलून गेले आहे. या घरात आता चुलीचा धूर पसरत नाही. केरोसीनच्या दिव्यांची काजळी दिसत नाही. या परिवर्तनाचे श्रेय सोलर सहेलींना द्यावे लागेल. या महिलांना सात लाखांहून जास्त सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चुली, दिवे, टॉर्च, होम लायटिंगची उपकरणे व पथदिवे या भागात पोहोचवले आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे सुमारे ९.५० लाख टन कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी मदत झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय संस्था गोगलाचे म्हणणे आहे. हा उपक्रम अनिवासी भारतीय अजेता शहा यांनी ८ वर्षांपूर्वी सुरू केला होता. जीईएस समिटमध्ये हा सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवला गेला होता. कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी व इव्हांका ट्रम्पही उपस्थित होते. अजेता म्हणाल्या, गावातील महिला चारभिंतीतून बाहेर पडल्या. त्यांनी कुटुंबाची परिस्थिती सुधारतानाच पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्याच्या कार्यातही योगदान दिले. हे महिला सशक्तीकरणाचे चांगले उदाहरण म्हणता येईल. आता या वर्षाच्या अखेरीस उत्तर प्रदेश, बिहार, आेडिशासारख्या राज्यांतही असा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील.
५००० गावांत पाहणी नंतर प्रकल्प सुरू
न्यूयॉर्कमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या भारतवंशीय अजेता शहा २००५ मध्ये मायक्रो फायनान्सच्या फेलोशिपसाठी भारतात आल्या. तेव्हा अनेक राज्यांत विजेचा तुटवडा दिसला. ५ हजार गावांत संशोधन करून २०११ मध्ये अजेता यांनी फ्रंटियर मार्केट्स कंपनी सुरू केली व ग्रामीण भागातील महिलांना सोलर सहेलीच्या रूपाने जोडले.
महिला चांगल्या पद्धतीने सांगतात
ग्रामीण भागातील लोकांना सौर उत्पादनांचे महत्त्व चांगल्या प्रकारे सांगण्याचे काम महिला करू शकतात. त्यामुळे त्यांना या प्रकल्पाशी जोडण्यात आले. केसरोली गावाच्या मिशकिना बानो व सहकारी म्हणाले, आता मुलांची फी आम्हीच भरतो. आधी घराबाहेर पडत नव्हतो. आता दर महिन्याला ५ हजार रुपयांची कमाई होते.
२५ हजार महिलांना जोडण्याचे उद्दिष्ट
अजेता म्हणाल्या, सोलर सहेली सौर उत्पादनांशिवाय गावांत ई-कॉमर्स कंपनीच्या धर्तीवर इतर उत्पादनांची विक्रीही करतील. त्यातून त्यांच्या कमाईत वाढ होईल व गावांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील. २०२२ पर्यंत प्रकल्पातून २५ हजार महिला १५ लाख घरांपर्यंत पोहोचू शकतील. त्यातून १ कोटीहून जास्त लोकांचे जीवनमान सुधारू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.